नगर: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविल्याचे समजताच न्यायालयाच्या निकालाचे शहरात मूर्तिकार संघटनेतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणेश मंदिर यांच्या चरणी नतमस्तक होऊन संघटनेच्या वतीने गुलालाची उधळण करत ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व मूर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा मूर्तिकार संघटना, प्रांत मूर्तिकार संघटना यांच्यासह प्रत्येक मूर्तिकार कारागीराने वेळोवेळी आंदोलने करून, शासकीय अधिकारी, मंत्र्यांना निवेदने दिली. या सर्व प्रयत्नांना व आंदोलनाला यश आल्याची भावना नगरमधील मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
निंबाळकर म्हणाले की, राज्य सरकारने यासाठी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून अहवाल मागवला. पीओपी शास्त्रीयदृष्ट्या वातावरणासाठी हानिकारक नसल्याचा अहवाल सादर झाला.
उच्च न्यायालयाने (सीपीसीबी) केंद्रीय प्रदूषण नियामक महामंडळाकडे तो 5 मे 2025 रोजी सुपूर्त केला. त्या अनुषंगाने सोमवारी (दि. 9 जून) मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठूवली. पीओपी निर्मिती, साठवणूक, विक्री आणि स्थापना यासाठी न्यालायलाने परवानगी दिली असल्याचे निंबाळकर म्हणाले.
या लढ्यात वसंत लोढा, बापू ठाणगे, कायदा सल्लागार भगवान जगताप, शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना व तरुण मंडळ यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे सर्वांनी आभार मानले.