खेड: खेड-शिंपोरा रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेला आणि खेड, शिंपोरा, बाभूळगाव, मानेवाडी आदी गावांचा संपर्क पूर्णतः तुटला. परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकार्यांच्या फौजफाट्यासह पूल पाहणी करत नवीन पुलाच्या मंजुरीसाठी तत्काळ प्रस्ताव तयार करून ग्रामविकास विभागाकडे सादर करण्याच्या सूचना केल्या.
खेड-शिंपोरा रस्त्यावरील पूल दि. 25 मे रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी, दूध उत्पादक आणि छोट-मोठ्या व्यापार्यांची मोठी गैरसोय झाली. पूल वाहून गेल्यानंतरही काही दिवस कोणतीही ठोस कार्यवाही झाली नव्हती. अखेर शिंपोरा येथील शिवसेना तालुकाप्रमुख बिभीषण गायकवाड आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय मोरे यांनी ग्रामस्थांसह सभापती राम शिंदे यांची चौंडी येथे भेट घेऊन निवेदन दिले. (Latest Ahilyanagar News)
यानंतर दुसर्याच दिवशी सभापती शिंदे यांनी कोणताही विलंब न करता संबंधित विभागाचे अधिकारी घेऊन पूल पाहणीसाठी स्वतः हजर राहिले. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या वेळी त्यांनी पक्ष किंवा गट-तट बाजूला ठेवून सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्याचा प्रयत्न केला.
पूल कमी कालावधीत वाहून गेल्याने कामात गंभीर त्रुटी असल्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित दोषींवर कारवाईसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले. दोन दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सभापती शिंदे यांनी अधिकार्यांना दिले.
या वेळी उजनी कालवा विभाग पुनर्वसन कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता चव्हाण, उपविभागीय अधिकारी मंजूनाथ तुंबळ, भीमा उपसा सिंचन करमाळा उपविभागाचे उपअभियंता अजित झोळ, प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार गुरू बिराजदार, तलाठी, ग्रामसेवक, अनेक गावाचे स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिंदेंचा संवेदनशीलपणा नागरिकांना भावला!
पूल पाहणी संपताच अर्ध्या तासात सभापती राम शिंदे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून पुलाच्या नव्याने मंजुरीसाठी पत्रव्यवहार करत तातडीची विनंती केली. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी दाखवलेला ‘संवेदनशीलपणा’ नागरिकांना भावला.
विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकार्यांची मदत
पूल वाहून गेल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठीही सभापती राम शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधत त्वरित उपाययोजनांची मागणी केली. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या रहदारीसाठीही लवकरच तात्पुरती व्यवस्था उभारली जाणार आहे.