राहाता: जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ धाव घेतली.
स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून, नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा विचार प्रशासकीय अधिकार्यांना करावा लागणार आहे, असे सांगत, याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.(Latest Ahilyanagar News)
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी व अस्तगावातील काही भागामध्ये चक्रीवादळ सदृश्य पावसाने हाहाकार उडविला. डाळिंब व आंबा, ऊस व साठविलेल्या कांद्यासह घरे व काही गोठ्यांवर झाडे पडून मोठे आर्थिक नुकसान झाले.
या नुकसानग्रस्त भागाला मंत्री विखे पाटील यांनी भेटी देत, शेतकर्यांना आर्थिक मदत मिळवून देवू, असा दिलासा दिला. अधिकार्यांना सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश देत, राज्य सरकार नैसर्गिक संकटात शेतकर्यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कम उभे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
‘महावितरण’चा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करा, अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी पाहणीनंतर अधिकार्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत केल्या. भाऊसाहेब म्हस्के यांची कांदा चाळ, डाळिंब उत्पादक राहुल कसाब व डाळींबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळींब बागांची थेट बांधावर जाऊन मंत्री विखे पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह वीज वितरण, सार्वजनिक बांधकामचे अभियंता उपस्थित होते.
वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक चक्र पूर्णतः बदलले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे एका दिवसात धरणात एक टिएमसी पाणी येणे, असेसुध्दा घडू शकते. यामुळे नैसर्गिक परीस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
वादळ वार्यामुळे वीज पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. तो तत्काळ सुरू करा. ‘महावितरण’ अधिकार्यांनी याकामी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. ही आपत्ती नैसर्गिक असली तरी, भविष्यात होणारे नुकसान कसे टाळता येऊ शकते, यावरचं उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या.
राहुल कसाब यांची फळभाग पूर्णत भुईसपाट झाली आहे. या बागेची पुणर्र बांधणी करण्यासाठी उपाययोजना करता येईल, याविषयी डाळिंबरत्न डॉ. बी.टी. गोरे यांच्याशी चर्चा करून, मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करा, चाळीतील कांद्यावर झाडे पडल्यामुळे कांदा पूर्णतः भिजला आहे. या कांद्याचे पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या.
नुकसानीचे सरसकट पंचनामे करा
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधून, सरकार आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. शासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले. पंचनामे करण्यासह मदत मिळवून देण्यास अडचण आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी चर्चा करुन, नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.