

Satyajeet Tambe demands 50 lakh compensation
संगमनेर: नगरपालिकेच्या अधिकार्यांनी अनाधिकृतपणे भूमिगत गटार जोडली. काम करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना नगरपालिकेने किंवा सरकारने तातडीने प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. तसेच नगरपालिकेतील प्रशासनातील अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात भूमिगत गटारीचे काम सुरू असताना मृत पावलेल्या नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमकतेने आ. तांबेनी भूमिका मांडली. (Latest Ahilyanagar News)
आ. तांबे म्हणाले की, संगमनेर शहरात भूमिगत गटारीच्या कामांना 2021 मध्ये मंजुरी मिळाली. परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अपूर्ण राहिले. काम अपूर्ण असतानाही नगरपालिकेने अनाधिकृतपणे ही गटार जोडली आहे. यामुळे गटारीचे काम सुरू असताना ठेकेदाराचा कर्मचारी अतुल पवार हा मृत्यू पावला व त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पिंजारी याचाही विषारी वायूमुळे मृत्यू झाला.
नगरपालिकेच्या अधिकार्यांनी काम अपूर्ण असताना ही गटार जोडली नसती, तर दुर्घटना झाली नसती. याबाबत ठेकेदारांवर कारवाई झाली आहे. याचबरोबर संबंधित प्रशासकीय अधिकार्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नगरपालिकेने प्रत्येकी 50 लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे आणि जर नगरपालिकेला शक्य नसेल तर सरकारने याची किंवा मुख्यमंत्री निधीतून तरतूद करून मदत द्यावी, अशी आग्रही मागणी केली.