Sangamner News
कामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची फिर्याद Pudhari

Sangamner News: कामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची फिर्याद

कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती.
Published on

संगमनेर: संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार सफाई करताना गुदमरून एक कर्मचारी व त्याला वाचवायला गेलेल्या स्थानिक तरुण अशा दोघांना आपला जीव गमावा लागला. या प्रकरणी ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. (Latest Ahilyanagar News)

Sangamner News
Nagar News: शहरातच होणार वैद्यकीय महाविद्यालय; देवेंद्र फडणवीस यांचे संग्राम जगताप यांना आश्वासन

संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना अतुल रतन पवार या कर्मचार्‍याचा गुदमरून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय 21, रा. मदिनानगर) हा तरुणही गटारात गुदमरला आणि त्याचाही उपचारादरम्यान गुरुवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद पठाण यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री एक वाजता फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, एसटीपी प्लांटचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे तसेच बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangamner News
Sangamner News: गटारात काम करताना गुदमरून तरुणाचा मृत्यू; संगमनेरातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. एसटीपी प्लांटच्या भूमिगत गटारींच्या साफसफाईचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच, आरोग्य विभागाची पूर्वपरवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय मजुरांना गटारात उतरवले.

यामुळे कर्मचार्‍याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news