

संगमनेर: नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी भूमिगत गटारात काम सुरू असताना विषारी वायूमुळे गुदमरून अतुल रतन पवार या तरुण कर्मचार्याचा मृत्यू झाला, तर प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी हे दोन जण अत्यवस्थ झाले. गुरुवारी (दि. 10) दुपारी झालेल्या घटनेमुळे काही काळ अधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रोडवरील गटाराचे काम करीत असताना पवार या कर्मचार्याला विषारी वायूमुळे गटारात श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कर्मचार्यांचा आणि स्थानिक नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला. त्यात तीन जण गटारात बेशुद्ध पडले. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ झाला. नागरिकही मोठ्या संख्येने जमले. त्यांनी मदतीचा प्रयत्न केला. (Latest Ahilyanagar News)
माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र देशमुख व पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गटारात बेशुद्ध पडलेल्या तिघांना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र पवार याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, निखिल पापडेजा आदींसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिस अधिकार्यांची भेट घेऊन यातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
भूमिगत गटार कामात आवश्यक सुरक्षा मानके पाळली गेली होती का, याबाबत सखोल चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे भूमिगत कामांच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला असून या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल होतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.