

नगर: जिल्ह्यात 1223 गावांच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत 23 ते 25 एप्रिल रोजी काढली होती. मात्र शासनाने ही सोडत रद्द ठरवून नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येत्या बुधवारी (दि.23) सात तालुक्यांतील व गुरुवारी (दि.24) सात तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेरआरक्षण काढण्यात येणार आहे.
5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधी होणार्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 1223 गावांच्या सरपंचपदाचा प्रवर्गनिहाय आरक्षण कोटा शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्ग 150, अनुसूचित जमाती प्रवर्ग 119 तर ओबीसी प्रवर्गासाठी 330 जागा सरपंचपदासाठी राखीव ठरविण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक प्रवर्गातील 50 टक्के जागा महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. त्यानुसार 625 ग्रामपंचायतींवर महिला राज विराजमान असतील. (Latest Ahilyanagar News)
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 7 जुलै रोजी जिल्ह्यातील 1223 ग्रामपंचायतींचे फेरआरक्षण काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शासनाच्या आदेशानुसार फेरआरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
तहसील कार्यालयांत दुपारी 12 वाजता तहसीलदारांच्या उपस्थितीत सर्वसाधारण व राखीव जागांवरील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही आरक्षण सोडत झाल्यानंतर त्याच ठिकाणी दुपारी 1 वाजता प्रांताधिकारी महिला आरक्षण सोडत काढणार आहेत.
तालुकानिहाय आरक्षण सोडत
23 जुलै : अकोले, जामखेड, श्रीरामपूर,कोपरगाव, शेवगाव, श्रीगोंदा व अहिल्यानगर
24 जुलै : नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, कर्जत व संगमनेर.