

कोळपेवाडी: निळवंडेच्या डाव्या-उजव्या कालव्यांना मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे कालव्याच्या तळेगाव शाखेतून कोपरगाव मतदार संघाच्या सर्व लाभधारक गावातील साठवण तलाव, गावतळे, साठवण बंधारे भरून द्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.
कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावांसाठी निळवंडे कालवे वरदान ठरले असून आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून नियमितपणे प्रत्येक जिरायती गावांमध्ये निळवंडे धरणाचे पाणी वेळेवर पोहोचत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Latest Ahilyanagar News)
निळवंडेचे आवर्तन सुरु होताच सर्वच लाभधारक क्षेत्रातील गावांना फायदा व्हावा, यासाठी सर्व साठवण तलाव, गावतळे, बंधारे कसे भरले जातील, यासाठी त्यांचा आटापिटा सुरु असतो. त्यासाठी आ. काळे स्वत:ची यंत्रणा देखील उभी करतात. त्यामुळे जिरायती गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागले नाही.
यावर्षी मे आणि जून महिन्यात पावसाने आशा पल्लवीत केल्या. सर्वच धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच धरणे दुप्पट क्षमतेने किंवा त्यापेक्षा जास्त भरलेली आहेत व जायकवाडी धरण देखील जुलै महिन्यातच 75 टक्यांवर जाऊन पोहोचले आहे.
परंतु जूनचा शेवटचा आठवडा ते जुलै संपत आला तरी कोपरगाव मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे उष्णता देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून खरीप पिके सुकू लागली आहेत. याची दखल घेवून निळवंडे कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनातून तळेगाव शाखेतून जिरायती भागातील तलाव,गावतळे,बंधारे भरून देण्याच्या सूचना आ काळे यांनी केल्या आहेत.
प्रत्येक गावात पाणी पोहचलेच पाहिजे!
प्रत्येक गावातील गावतळे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी निळवंडेचे पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेच पाहिजे. भूजल पातळी वाढली जावून काही प्रमाणात शेतकर्यांना खरीप पिकांना पाणी देता येईल व खरीप पिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.
त्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना आ.काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.त्यानुसार दोन दिवसात पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले आहे.