

टाकळीभान: टाकळीभानसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत. याशिवाय पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे बळीराजाचे आता पावसाकडे लक्ष लागले आहे.
खरीप हंगाम सुरु होऊन महिन्याभराचा कालावधी उलटला असून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा टाकळीभानसह परीसरातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे. त्यातच मका पिकावर लष्करी अळी, सोयाबीनवर यलो मोझॅक तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे राहीले आहे. (Latest Ahilyanagar News)
टाकळीभानसह परीसरातील खोकर, भोकर, कारेगाव, कमालपूर, खानापूर, भामाठाण, माळवाडगाव, मुठेवाडगाव, बाजाठाण, गुजरवाडी, खिर्डी या परीसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कपाशी व मका पिकांची लागवड झाली आहे. पिके जवळपास एक महिन्याची झाली असून वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या परीसरात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकायला सुरवात केली आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस कोरडे हवामान वर्तवले असल्याने शेतकर्यांमधे मोठी चिंता पसरली आहे.
एकीकडे शेतकरी पावसाच्या खंडामुळे चिंतेत असताना दुसरीकडे विविध पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हैरान झाला आहे. उगवून आलेल्या सोयाबीनची पाने पिवळी पडली असून रोपे कोमेजुन जात आहे.
महत्वाचे चारा पिक मानल्या जाणार्या मका पिकावर अमेरीकन लष्करी अळीने हल्ला केल्याने पिकाचे मोठे नुकसान होण्याची भिती आहे. तर कपाशी पिकावर मावा, तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर परीणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. यातून फवारणीचा अतिरीक्त खर्च वाढला आहे.
अमेरीकन लष्करी अळी प्रादुर्भाव
अमेरीकन लष्करी अळीच्या तीन दिवसांत दोन हजार अळ्यांची निर्मीती होते. मादी पतंग मकाच्या पानावर पुंजक्यामधे अंडी घालते. एका पुंजक्यामधे 100 ते 200 अंडी असतात. एक मादी 1500 ते 2000 अंडी घालते अंड्यातून दोन ते तीन दिवसात अळ्या बाहेर येतात. या अळ्या झुंडीने मका पिकावर आक्रमन करुन पिक फस्त करतात. त्यामुळे वेळीच अळीवर उपाययोजना करणे गरजेचे असल्याने किटक नाशक फवारणी खर्चाने शेतकरी त्रस्त झालेले आहे.