

कर्जत: श्री संत सद्गुरू गोदड महाराज रथयात्रेनिमित्त मेघनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते स्व. रामभाऊ बाबूराव धांडे यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती स्पर्धेत सद्गुरू गोदड महाराज किताब व दोन किलो वजनाची चांदीची गदा पुणे येथील पहिलवान रविराज चव्हाण यांने पटकावली. त्याने अकलूजच्या सत्यपाल सोनटक्के याला एक लंगी डावात चितपट केले. कर्जत येथील कुस्ती स्पर्धा राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. स्व. दिलीप नाना तोरडमल क्रीडा संकुलात कुस्ती स्पर्धा झाली.
स्पर्धेत महाराष्ट्र केसरी प्रशांत जगतापने प्रेक्षकांची मनी जिंकली. त्याने पुण्याचा शुभम कोळेकर याला चितपट करून विजय मिळवला. कर्जत येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये विजेता झालेला प्रशांत जगताप याची कुस्ती कोल्हापूरच्या शुभम कोळेकर यांच्यासोबत लावल्यानंतर काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दोघांमध्ये डाव-प्रतिडाव करण्यात आले. मात्र, अखेर प्रशांत जगतापने कोळेकर यास अस्मान दाखविले.
स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा श्रीमंत भोसले व पुण्याचा पैलवान श्री पाथरूड यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. पुण्याच्या हनुमान आखाड्यातील मल्ल शाहरुख खान विरुद्ध पुण्याच्या शिवराम दादा तालमीतील मंगेश माने, अकलूजचा करण मिसाळ विरुद्ध अंगत बुलबुले, अहिल्यानगरचा ऋषी लांडे विरुद्ध सोलापूरचा स्वप्निल काशीद, कर्जतचा विकास तोरडमल विरुद्ध पुण्याचा अक्षय चव्हाण या कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या.
कर्जत येथील पैलवान हर्षवर्धन पठाडे याने अहिल्यानगरचा गोवर्धन शिंदे यास अस्मान दाखवले, तर कर्जतचा दुसरा पैलवान धुळाजी इरकर याने कंदरचा सूरज कोळेकर, याशिवाय कोरेगावचा भैया शेळके व इचलकरंजीचा गिरीश गोडसे यांच्यामध्ये प्रेक्षणीय कुस्ती झाली. कुस्ती स्पर्धेचे नियोजन पै. किरण नलवडे व पै. ऋषिकेश धांडे यांनी केले होते. स्पर्धेसाठी आमदार रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मदत केली. आमदार रोहित पवार हे स्वतः या स्पर्धेसाठी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून बाप्पाजी धांडे, प्रवीण घुले, नामदेव राऊत, शहाजी नलवडे, काकासाहेब धांडे, प्रा. शिवाजी धांडे, ऋषिकेश धांडे, प्रशांत पाटील, ओंकार पाटील, तानाजी पाटील, नारायण नेटके, अंबादास पिसाळ, प्रदीप पाटील, सुरेश खिस्ती, दत्ता शिंदे, दादा सोनमाळी, प्रकाश धांडे, यांनी काम पहिले.
या वेळी उपनगरअध्यक्ष संतोष पाटील, सरपंच अनिल खराडे, काका डेरे, सुनील शेलार, सतीश पाटील, अनिल गदादे, भाऊसाहेब तोरडमल, दत्ता नलवडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.