

कोपरगाव : पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय ब्रास बॅन्ड स्पर्धेमध्ये संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बॅन्ड पथकाने अप्रतिम, शिस्तबध्द व कलात्मक सादरीकरण करून, पुन्हा महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकावर चमकदार मोहोर उमटवली आहे.
‘आम्ही ग्रामीण भागातील असलो तरी, कुठेच कमी नाही,’ हे वास्तव बँड पथकाने सिद्ध करुन दाखविले, हे विशेष! विशेष उल्लेखनिय बाब अशी की, ‘संजीवनी’ने सलग दुसऱ्यावर्षी या स्पर्धेत राज्यात अव्वल असल्याचे अधोरेखित केले आहे. या यशानंतर ‘संजीवनी’ संघ देश पातळीवरील विभागीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.
भारत सरकार शैक्षणिक मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पुणे येथे जल्लोशात पार पडल्या.
स्पर्धेत राज्यातील तब्बल 37 संघांनी सहभाग नोंदविला. बहुतांश संघ महानगरी क्षेत्रातील होते. 7 संघ अंतिम फेरीत पोहचले. यामध्ये ग्रामीण भागातील ‘संजीवनी’चा यशस्वी सहभाग होता. इ. 10 वीचा कॅडेट विपुल दीपक वाघ याच्या नेतृत्वाखाली 37 कलांकारांनी ब्रास बॅन्ड कलेचे शिस्तबध्द व शास्त्रशुद्ध सादरीकरण करून, परीक्षकांच्या विविध कसोट्या पूर्ण करीत, राज्यात विजेतपदावर दमदार मोहर उमटवली. आता पुढील स्पर्धेत पश्चिम विभागात महाराष्ट्र , गुजरात, गोवा, मध्य प्रदेश , राजस्थान, दादरा- नगर हवेली, दीव- दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्येही जिंकायचेचं, अशा जिद्धीने ‘संजीवनी’चे ब्रास बॅन्ड पथक सराव करीत आहे.
‘संजीवनी’चे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सहभागी विद्यार्थ्यांसह नॉन अकॅडमिक डा. डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, संगीत शिक्षक महेश गुरव, कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर, धोरण व वाढ अधिकारी आसिफ सय्यद यांचे अभिनंदन करुन, त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रामाणिक परीश्रम, नियमित सराव, शास्त्रोक्त मार्गदर्शन व मनोमन जिंकण्याची जिद्ध या बाबींनी ‘संजीवनी’च्या ब्रास बॅन्ड पथकाने राज्यात विजयाची चमकदार मोहर उमटवली. ब्रास बॅन्ड सांस्कृतिक क्रीडा प्रकार आहे. यात शारीरिक क्षमतेसह कलेचे मोठे कसब लागते. इतर क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांना शास अधिक गुण देवून, शासकीय सेवेत आरक्षण देतेे. अशीच सवलत ब्रास बॅन्डमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. यामुळे पालक पाल्यांना प्रोत्साहित करतील. त्यांना भविष्यात अनेक संधी प्राप्त होतील, अशी अपेक्षा संजीवनी कॉलेजचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी व्यक्त केली.
‘संजीवनी’ संस्थेचे संस्थापक माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दुरदृष्टी ‘संजीवनी’च्या कायम केंद्रस्थानी आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेसह कला, क्रीडा, नेतृत्व, शिस्त अशा सर्वांगिण गुणांचा विकास करण्यासाठी संस्थेचे विशेष लक्ष आहे. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण ओळखून त्यांना विकसित केले जाते. या फलश्रुतीतून ‘संजीवनी’चा ब्रास बॅन्ड संघ राज्यात अव्वल ठरला. हा राज्यस्तरीय विजय आम्ही स्व. कोल्हे यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करतो.
सुमित कोल्हे, संजीवनी कॉलेजचे विश्वस्त, कोपरगाव.