

नगर : शहराच्या मध्यवर्ती परिसरातील बुरुड गल्ली या ठिकाणी मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन मजली जुन्या इमारतीला आग लागली. चंगेडिया यांच्या मालकीच्या या हेरिटेज इमारतीत असलेल्या ‘ए एस मार्केटिंग’चे मोठे गोदाम या आगीत खाक झाले.
सकाळच्या वेळी फेरफटका मारणाऱ्या (सकाळचा व्यायाम करणाऱ्या) लोकांना दुकानातून धूर येत असल्याचे दिसल्याने एकच खळबळ उडाली. सदर परिसरात लाकडी वस्तू व बांबूचा व्यवसाय असल्याने, तसेच गोदामात कॅडबरीसह किरकोळ मालाचा साठा असल्याने आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता;
मात्र स्फोटासारखा आवाज झाल्याने स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे. आगीची प्रचंड तीव्रता पाहून महापालिकेचे अग्निशमन दल सुरुवातीला कमी पडले. त्यांच्या बंबांमध्ये पुरेसे पाणी नव्हते, तसेच शटर तोडण्यासाठी हातोडे, ब्रेकर यांसारख्या साधनांचा अभाव होता, अशी तक्रार नागरिकांनी केली.
दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनी तत्काळ सैन्य दलातील अग्निशमन बंबांना पाचारण केले. महापालिकेच्या बचाव पथकाने (रेस्क्यू पथक) तातडीने शेजारील सात ते आठ घरे रिकामी केली. अखेरीस, मनपा आणि सैन्य दलाच्या 20 ते 22 अग्निशमन वाहनांनी अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले. आयुक्तांनीही घटनास्थळी धाव घेऊन आढावा घेतला.
शहरात बहुमजली इमारती उभ्या राहत असल्याने महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या अजून बळकटीकरण, अधिक सुसज्ज व अत्याधुनिक करण्याची गरज आहे. तसेच प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासत आहे. याची मागणी मागच्या अधिवेशनात राज्य सरकारकडे केली आहे. अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आ.संग्राम जगताप यांनी सांगितले. आ. जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि चंगेडिया परिवाराची भेट घेऊन त्यांना आधार दिला.