

कोपरगाव :शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुनी गंगा देवी मंदिरात रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. मंडप, आकर्षक विद्युत रोषणाईसह दहा दिवस आरती, जोगवा, भारुड, प्रवचन, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दहा दिवस या परिसरात विविध खेळण्याची दुकाने, पान फुलांची दुकाने, खाद्यपदार्थांची स्टॉल, लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने येथे येतात व मोठी यात्रा भरते, अशी माहिती श्री जुनी गंगा मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक विलास नाईकवाडे यांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
दरवर्षी या मंदिरात मोठ्या प्रमाणावर नागरिक महिला घटी बसतात, मात्र गेल्या एक-दोन वर्षापासून हे प्रमाण कमी झाले आहे. यंदाचे नवरात्र दहा दिवसांचे आहे,जुनी गंगा देवी हे मंदिर कुंभारी परिक्षेत्रात येते, नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ओळख आहे. दर मंगळवार शुक्रवार व नवरात्र उत्सवात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी येथे असते. मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात दोन ट्रॅक्टर मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे.
जुनी गंगा देवी मंदिराच्या मूर्तीची रंगरंगोटी पूर्ण झाली असून देवीला दोन सोन्याच्या नथी, दोन चांदीचे टोप व एक चांदीचा कमरपट्टा असे अलंकार आहेत, अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली. नवरात्र उत्सवात भक्तांना चहा, पाणी, कॉफी, दूध, राजगिरा लाडू, केळी, साबुदाणा खिचडी आदींचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते. दरम्यान मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या डागडुजीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांनी मुख्याधिकार्यांकडे केली आहे.
दरम्यान, दि. 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे कोपरगावातील नागरिक पहाटे 4 वाजल्यापासून मोहिनीराज नगर मार्गे जुनी गंगा देवी मंदिराकडे जातात. मात्र, गोदावरी नदीवरील छोटा पूल ते मंदिर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे भाविकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तसेच जुना रस्ता खराब असल्याने नागरिक मोठ्या संख्येने मोहिनीराज नगर मार्गे ये-जा करत आहेत. गर्दीच्या काळात अपघातांचा धोका वाढू नये म्हणून या मार्गावरील वाहतूक दुसर्या रस्त्याने वळवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.