

नगर : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदारयादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती सादर करण्याची नागरिकांना मुभा आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी जिल्हाभरात 30 लाख 7 हजार 404 मतदारसंख्या आहे. (Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषदेचे 75 गट व चौदा पंचायत समित्यांचे 150 गण आहेत. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 च्या विधानसभा मतदार यादीमधूनच गट व गणांच्या प्रारूप मतदारयाद्या जिल्हा प्रशासनाने तयार केल्या आहेत. या याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील व पंचायत समित्यांच्या कार्यालयांत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. यावर लेखी हरकती व सूचना सादर करण्यास 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी शारदा जाधव यांनी सांगितले.
संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, व जामखेड या अकरा नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीची प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीही बुधवारी (दि.8) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर हरकती सादर करण्यासाछी 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध होणार आहेत.