

नगर तालुका : नगर तालुक्यातील इमामपूर येथे बुधवारी (दि.8) भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी घडली. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
इमामपूर येथील शेतकरी अशोक भागचंद पाटोळे या शेतकऱ्याच्या शेळ्या शेतामध्ये चरत होत्या. त्याच वेळी अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने शेळ्यांवर हल्ला चढविला. त्यामध्ये तीन शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या, तर एक गंभीर जखमी झाली. ही घटना इमामपूर शिवारातील पाटोळे वस्तीवर घडली. (Ahilyanagar News)
जेऊर पंचक्रोशीत भटक्या, तसेच रानटी कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येते. परंतु त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. इमामपूर परिसरातील डोंगर रांगांनी रानटी कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच जेऊर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेऊर येथील बायजामाता डोंगर परिसर, तसेच गावठाणातील सीना नदीपात्रात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या परिसरात मटन, चिकन, मासे यांची दुकाने मोठ्या प्रमाणात असून, भटक्या कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होत असल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने फिरत असून शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरच भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच देवी बायजामातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्त भाविकांमध्ये देखील भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. इमामपूर येथील घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.