

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरून कंटेनरमध्ये कोंडून कत्तलीसाठी कर्नाटककडे नेली जाणारी 28 गोवंश जातीची जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली आहेत. या कारवाईत पोलिसांनी 32 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांना गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका 10 टायर कंटेनरमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. त्यांनी तातडीने या संबंधीची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना दिली. त्याच्या सूचनेवरून पोलिस नाईक बापूसाहेब हांडे, पोलिस कॉन्स्टेबल सुनील ढाकणे आदी पोलिसांनी संगमनेर ते पुणे रोडवर गस्त सुरू केली.
पहाटे 4.30 च्या सुमारास हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या पुढे जावळे वस्तीजवळ नाशिक-पुणे हायवेवर संशयास्पद वाटणारा कंटेनर (क्रमांक के.ए. -5 बी.-8920) पोलिसांनी अडवला. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यात जनावरे असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता, त्यात 28 गोवंश जातीचे बैल कत्तलीच्या उद्देशाने कोंडलेले आढळले. या जनावरांची एकूण किंमत 12 लाख 60 हजार रुपये आहे, तर 20 लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर असा एकूण 32 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक सय्यद रिजवान दस्तगीर (वय 32, रा. होले नरसिंगपूर, हसन, कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत ही जनावरे आरबाज राजू शेख (रा. कुरण, ता. संगमनेर) याच्या मालकीची असून ती कर्नाटकला कत्तलीसाठी नेली जात असल्याचे समोर आले आहे.
आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे सुधारित कलमान्वये संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जनावरांची सुटका करून त्यांना जीवदया गोरक्षक संस्था, पांजरपोळ (सायखिंडी फाटा) येथे सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.