

Karjat Jamkhed Political News
जामखेड/कर्जत: कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात पुरवणी मागण्यांवर बोलताना ठाम भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले.
कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्प, राज्य राखीव दलाच्या कुसडगाव येथील सेंटरच्या दुसर्या टप्प्यासाठी निधी, तसेच खर्डा व मिरजगाव पोलिस ठाण्यांच्या नव्या इमारतीसाठी निधीची मागणी केली. (Latest Ahilyanagar News)
तसेच ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या ठेवी तत्काळ परत मिळाव्यात, अशी मागणी करत मतदारसंघातील ठेवीदारांचे हित जपण्याची भूमिका त्यांनी मांडली. पोलिस दलातील प्रश्नांवरही त्यांनी सरकारला जाब विचारला. पोलिसांसाठी गृहकर्ज योजना, पदोन्नती, बदली प्रक्रिया आणि पोलिस भरतीच्या अडचणी सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
कर्जत-जामखेडमधील युवकांसाठी रोजगारनिर्मितीचा मोठा पर्याय ठरू शकणारा एमआयडीसी प्रकल्प राजकारणात अडकला आहे. तो मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सौरऊर्जा प्रकल्पांसाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असतानाही सोलर कनेक्शन वेळेवर दिले जात नाही. दुसरीकडे वीज कनेक्शनही नाकारले जाते, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विजेच्या खांबांसाठी नियमावली करा
नैसर्गिक आपत्तीमध्ये पडलेल्या विजेच्या खांबांमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून, अशा खांबांना पुन्हा उभे करण्यासाठी सुसंगत व स्पष्ट नियमावली तयार करावी, अशी मागणीही आमदार पवार यांनी केली.