

टाकळी ढोकेश्वर: शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यासाठी महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारला आहे.आगामी काळात शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी जन आंदोलन उभारण्याच्या संदर्भात नुकतीच माजी मंत्री तथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर व भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांची बैठक नगर येथे झाली.
तुपकर नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. यादरम्यान वाडेकर यांनी पदाधिकार्यांसह त्यांची नगर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेत स्वागत केले. यावेळी जवळपास दीड ते दोन तास शेतकर्यांच्या कर्जमाफी साठी, तसेच विविध विषयांवर चर्चा झाली. (Latest Ahilyanagar News)
बैठकीत राज्य सचिव किरण वाबळे, जिल्हा संघटक बाळशिराम पायमोडे, पारनेर तालुका उपाध्यक्ष अन्सार पटेल, अरूण बेलकर, साईनाथ घोरपडे उपस्थित होते.
यावेळी रविकांत तुपकर व संतोष वाडेकर यांनी आगामी काळात शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी लढा कसा उभारता येईल याबाबत चर्चा केली. तसेच शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा उभारणार असल्याचे बैठकीत ठरले.
यावेळी तुपकर म्हणाले, राजकीय पक्ष तसेच काही संघटनांनी फक्त माझा वापर करून घेतला. त्यामुळे यापुढे आता निस्वार्थी पणाने स्वतंत्र महाराष्ट्रभर चळवळ राबविण्यात येईल. सर्वांनी मिळून महायुती सरकारला शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू असा निर्धार तुपकर यांनी व्यक्त केला