

नेवासा: तालुक्यातील बेलपिंपळगांव येथे मागील आठवड्यात कायमस्वरूपी दारूबंदी होण्याकरिता पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामस्थांनी एकत्र येऊन लाक्षणिक उपोषण केले. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी सरपंच किशोर गारुळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला.
बेलपिंपळगांवमध्ये अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्रेत्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. गावातील तरुणपिढी दारुच्या आहारी गेल्यामुळे जवळपास सहा महिन्यांमध्ये पाच ते सहा नवयुवक तरुण हे विषारी दारू प्राशन केल्यामुळे दगावले आहेत. काही तरुण विकलंग आल्याने त्यांचे भविष्य अंधारमय झाले. (Latest Ahilyanagar News)
या ग्रामसभेत गावातील बनावट दारू व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला. गावात दारू विकताना आढळल्यास त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्याला सहआरोपी करण्यात येणार आहे.ज्या जागेत ग्रामपंचायत नळकनेक्शन असून तिथे अवैध धंदे सुरू असेल. ती जागा ग्रामपंचायत प्रशासन त्या व्यक्तींकडून काढून घेणार असल्याचा ठराव घेण्यात आला.
यापुढे गावात दारू विकताना कोणी आढळल्यास त्याला काळे फासून गावभर धिंड काढण्यात येईल. गावामध्ये अवैध धंदे बंद करण्यासाठी गावपातळीवर प्रांताधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुष असे वेगवेगळे ग्रामसुरक्षा दल स्थापना करण्यात येणार आहे. जेणेकरून गावातील कायदा सुव्यवस्था व जातीय सलोखा अबाधित राहण्यास मदत होईल. हे सर्व प्रमुख मुद्दे ग्रामसभेत संमत करण्यात आले.
यावेळी सरपंच किशोर गारुळे, कृष्णा शिंदे, चंद्रशेखर गटकळ, राजेंद्र साठे, उपसरपंच निकिता सरोदे, गणेश कोकणे, भाऊराव भांड, वसंत कांगुणे, कामगार पोलिस पाटील संजय साठे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भीमराव साठे, बाळासाहेब शिंदे, प्रा. रमेश सरोदे, बबन वरघुडे, राजेंद्र गायकवाड, अमोल कोकणे, वसंत भद्रे, बाबासाहेब रोटे, सुनील शेरकर, गणेश शिंदे,उमेश शिंदे, योगेश शिंदे, अण्णासाहेब वैद्य, बाबासाहेब कांगुणे, कैलास शिंदे, बाळासाहेब सरोदे, गंगाधर चौगुले, सुषमा साठे,अनिता हळनोर, सुखदेव कदम, संभाजी शिंदे, वसंत शेरकर, राम वरघुडे, किशोर गटकल, शिवाजी साठे, महेश शिंदे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब डौले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.