

राशीन: ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात बामुनीगाव पोलिसांनी वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या राशीनच्या (कर्जत, जि. अहिल्यानगर) दोघांसह चार जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २२ किलो गांजा, एक आलिशान कार आणि चार मोबाईल फोन जप्त केले आहेत.
साहिल अल्लाउद्दीन काझी, समीर शब्बीर मुलाणी (दोघे रा. राशीन) आणि अभिजित अनिल मोरे (रा. लोणी काळभोर, जि. पुणे), दिनेश सोपान काळे (रा. साळसे, ता. करमाळा, जि. सोलापूर), अशी चौघांची नावे आहेत. यातील काझी हा भाजपच्या कर्जत तालुका कार्यकारिणीत पदाधिकारी असल्याचे समजते.
ओडिशातील पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ जून रोजी सकाळी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना काळ्या रंगाची आलिशान कार संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसली. कदंबा चौक येथे कार अडवून तपासणी केली असता, मागील सीटवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या गोणीतून गांजाचा वास येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर एनडीपीएस कायद्यातील नियमानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्याला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत वाहनाची आणि चौघांची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान गोणीत २२ किलो गांजा आढळून आला. पंचनामा करून गांजा, कार आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत चौघांनाही अटक करण्यात आली. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, आरोपींकडे गांजाच्या वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे किंवा परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बामुनीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.