

नगर: नामांकित धर्मादाय संस्थेच्या कार्यकारी मंडळावर बनावट कागदपत्रे व खोट्या नोटरीच्या आधारे बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. राकेश कांतिलाल गांधी, त्यांच्या पत्नी राजश्री राकेश गांधी (रा. महादेव अपार्टमेंट, पाईपलाईन रोड, सावेडी ), मोहीत कांतिलाल बोरा (रा.शिल्पा अपार्टमेंट, अहिल्यानगर) आणि एका अज्ञाताचा आरोपीत समावेश आहे.
उद्योजक तथा ट्रस्टचे सचिव अमित रसिकलाल कोठारी (रा.अहिल्यानगर ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सावेडी येथील पाईपलाईन रोडवरील महादेव अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर १ मध्ये 'रेज फाऊंडेशन' या धर्मादाय संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय आहे.
अमित कोठारी हे फाऊंडेशनचे सचिव असून त्यांची पत्नी श्वेता कोठारी सदस्य आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष योगेश बाफना यांच्याकडून अजेंडा बुक व प्रोसिडिंग बुक मागवण्यात आले. तपासणीत ८ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढल्याचे व २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सर्वसाधारण सभा झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात अशा कोणत्याही सभा झाल्याच नव्हत्या. सभेची कोणतीही नोटीस, सूचना वा माहिती संस्थेच्या सदस्यांना देण्यात आली नव्हती. अमित कोठारी व त्यांच्या पत्नीच्या बनावट सह्या केल्याचे रजिस्टरवर दाखवण्यात आले. या बनावट कागदपत्रांआधारे डॉ. राकेश गांधी व त्यांची पत्नी राजश्री गांधी यांची संस्थेच्या पदावर निवड झाल्याचे भासवण्यात आले.