

श्रीरामपूर: तालुक्यातील रामपूर कोकरे येथे सरकारी टेंडर झालेल्या जागेतून वाळू वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यास गावातील सुमारे 60 ते 70 महिलांनी विरोध केल्याने ठेकेदाराच्या समर्थकांनी महिलांवर जोरदार दगडफेक केली. ठेकेदाराचे समर्थक मागून दगड फेकताहेत आणि महिला व गावकरी पुढे पळताहेत, असे दृश्य नदीपात्रात दिसून आले.
दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षकांचे पथक दाखल झाल्यामुळे अनुचित काही प्रकार घडला नाही. मात्र महिलांवर वाळू तस्करांकडून हल्ले होत असताना कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
नेमकी काय घडले...
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून रामपूर येथील ग्रामस्थांनी सरकारी लिलावाला प्रचंड विरोध करत शहावली बाबा दर्ग्यासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणामध्ये ग्रामस्थांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमच्या गावातून वाळूचा खडादेखील उचलू दिला जाणार नसल्याचे प्रशासनाला लेखी स्वरूपात कळविले होते; मात्र शासकीय नियमानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन मुंबई येथील एका कंपनीने येथील वाळूचा ठेका घेतला. त्यानंतर या ठेकेदाराने वाळूउपसा करण्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करत येथून वाळूचा खडासुद्धा न देण्याचा संकल्प करत सराला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांना विनंती केली. आपणच लक्ष घालावे; वाळू राहिली तर शेती टिकेल.
वाळू गेली तर शेतीवर आधारित शेतमजूर / गुरे - ढोरे सिंचन व्यवस्था व पाझर व्यवस्था पूर्णतः बंद होऊन पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहील, म्हणून आम्हाला मदत करा, अशी आर्त हाक दिली होती. रामगिरी महाराजांनी देखील लक्ष घालत जिल्हाधिकारी तसेच काही मंत्र्यांशी संपर्क साधत वाळू उपसा होऊ न देण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्यांपासून वाळूसाठी रस्ता होऊ दिला नाही. मात्र मंगळवारी (दि. 19) दुपारी वाळू उपसा करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता करण्याचे काम सुरू असल्याचे महिलांना समजले. महिलांनी गोदावरी पात्राकडे धाव घेतली. मात्र रस्ता करत असलेल्या काहींनी महिलांवर दगडफेक सुरू केली. महिलांनी झाडांचा आसरा घेत गावातील पुरुषांना फोन करून बोलावले. गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे तरुणांचा जमाव नदीपात्रात आला. मोठा संघर्ष निर्माण झाला असता; मात्र पोलिसांनी तत्पर दाखल होत वेळीच भूमिका घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
गुन्हा नाही; महसूलचेही कानावर हात
महिलांवर वाळू तस्करांकडून हल्ले होत असताना कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यात महसूल विभागानेही कानावर हात ठेवले असून त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ सेटलमेंट करण्यातच हे दोन्ही विभाग मश्गूल असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.