

नगर: काळी जादू करून पैशांचा पाऊस पाडतो, असे भासवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायाधीशांनी एका भोंदूबाबाला दोषी धरीत दहा वर्षे सक्तमजुरी व 43 हजार दंडाची शिक्षा सुनावली. महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे (वय 42, रा. शिर्सुफळ, आटोळे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्या भोंदू बाबाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, पीडिता व तिचे वडील यांना वेळोवेळी मी देवऋषी असून कोणाच्या काही अडचणी असल्यास व भविष्य पाहून त्याचे निवारण करतो. तुमच्यावर लोकांनी करणी केली आहे. तुमच्या घरासमोर चेडे-गोटे ठेवलेले आहे. त्यासाठी विधी करावा लागेल, असे सांगून आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे जादूटोणा करण्यास सांगितले. पीडिता ही सतत आजारी पडत असल्याने तिला बरे करण्यासाठी एक पूजा करावे लागेल. त्यासाठी आरोपी व पीडिता यांचे एकमेकांच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घातलेले फोटे लागतील व त्यासाठी लग्नासारखा विधी करून, फोटो काढून ते पूजा करण्यासाठी वाघापूर येथील देवीसमोर ठेवावे लागतील, असे सांगून आरोपीने पीडितेच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घालून फोटो काढले.
आरोपी याने त्याला पैशाचा पाउस पाडण्याची कला येथे असे सांगून, वरील पूजा करण्यासाठी व पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पीडितेचे वडिलांकडून 5 लाख 50 हजार स्वीकारून त्यांचे आर्थिक शोषण व फसवणूक केली. नोव्हेंबर 2020 मध्ये आरोपी हा पीडितेच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन विनयभंग केला. डिसेंबर 2020 मध्ये रात्री पीडिता घरात झोपली असता आरोपीने तिला दमदाटी करून एअरगनचा धाक दाखवून दोनवेळा लैंगिक अत्याचार केला.
आरोपीने पीडितेसोबत पूजेसाठी काढलेल्या फोटोचा गैरवापर करून तिला ब्लॅकमेल करून तू माझी पत्नी आहेस, तू माझ्या घरी नांदायला ये, नाहीतर तुमच्या घरावर जादूटोणा करून तुमचे घर उद्ध्वस्त करून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रकार व जादूटोणा यांना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एच. एन. उगले यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्यधरून जिल्हा न्यायाधीश भोसले यांनी आरोपीला दोषी धरीत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल ढगे यांनी बाजू मांडली.