

नगर: जिल्ह्यात मी एकमेव असा नेता आहे, की ज्याच्या बाजूने सर्वाधिक दोन ठराव आहेत. मी प्रस्थापित नेता नसलो, तरी जिल्हा बँकेसाठी माझ्यावर सर्वांचा विश्वास आहे. त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित या दोघांचाही केंद्रबिंदू मीच आहे.
म्हणून माझ्याशिवाय कोणताही निर्णय शक्य नाही, अशी भूमिका विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी येथे मांडली. दरम्यान, संगमनेरच्या बैठकीची माहिती पालकमंत्री विखे आणि मलाही नव्हती. त्यामुळे आज तरी आम्ही दोघे एकाच भूमिकेत आहोत. अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
प्रा. शिंदे यांनी गुरुवारी (दि. १) सायंकाळी दैनिक पुढारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. ब्यूरो चिफ संदीप रोडे यांनी त्यांचे स्वागत केले.
या वेळी वृत्तसंपादक दीपक रोकडे, उपसंपादक गोरक्ष शेजूळ यांच्यासह ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर प्रा. शिंदे यांनी मनमोकळा संवाद साधला. जिल्हा बँक निवडणुकीसह सध्याचे राजकारण, दुष्काळ, जिल्हा विभाजन, मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण अशा विषयांवर चर्चा झाली.
प्रा. शिंदे म्हणाले, की संगमनेरात झालेली कथित ‘समझोता बैठक’ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारात न घेता झाली का? या प्रश्नाचे उत्तर माझ्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि बँक मतदारांना अद्याप मिळालेले नाही. विखे पाटील यांनी या बैठकीबाबत बोलले पाहिजे. त्यांची नेमकी काय भूमिका आहे, हे अजून समजले नाही. त्यामुळे तूर्त तरी आम्ही दोघेही एकाच भूमिकेत आहोत.
जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी, या ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या भूमिकेचे मी स्वागत केले. त्यानंतर संगमनेरात एक बैठक झाली. मात्र, बिनविरोधच्या आडून स्वतःचा राजकीय अजेंडा वापरला जात असेल तर बिनविरोध निवडणूक अवघड असल्याचे माझे मत आजही कायम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय घडेल, हे पाच तारखेनंतरच समजू शकते, अशा शब्दात त्यांनी सस्पेन्स पुन्हा वाढवला.
थोरात माझ्याशी बोलले; पण..
संगमनेरात बैठक झाली, त्याच दिवशी ‘जर बँक बिनविरोध करायची असेल तर कोणीही ‘आत्मकेंद्री’ राजकारण करू नये, असे मी स्पष्ट केले होते. अर्थात संगमनेरच्या बैठकीचे मला निमंत्रण होते; मात्र मी उपस्थित नव्हतो. बैठकीनंतर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी संपर्कही साधला. मात्र, पुढे अद्याप चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच काय ते समजेल, असेही शिंदे म्हणाले.
विस्थापितांसह प्रस्थापितांचाही माझ्यावर विश्वास
बँकेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्रस्थापितांची भूमिका जरी सहमतीची असली तरी त्याचा रोष अर्ज विक्रीतून समोर आला आहे. तीन दिवसांत 850 पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. त्यामुळे पाच पॅनल तयार होतील की काय, अशी शंका वाटू लागली आहे. यात विस्थापितांचाही पॅनल तयार होण्याची चिन्हे आहेत.
मात्र, कोणत्याही अजेंड्याशिवाय बिनविरोध निवडणूक करणार असतील तर मी आजही सकारात्मक आहे. अशा वेळी सभापती म्हणून ज्या प्रकारे सभागृहात दोन्ही बाजू सांभाळून घ्याव्या लागतात, त्याच पद्धतीने येथेही भूमिका घ्यावी लागेल. आणि तसाही विस्थापित आणि काही प्रस्थापितांचाही माझ्यावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
चुकीचे लोक नेमके कोण, तेही सांगा!
संगमनेरच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेत चुकीचे लोक जाऊ नयेत, अशी भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली होती. त्याबाबत विचारले असता, ‘चुकीचे लोक नेमके कोण, हेही त्यांनी स्पष्ट सांगावे,’ असे आवाहन शिंदे यांनी केले. काही शब्द आपण विसरू शकत नाही, अशा तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.