

जामखेड: दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जामखेड व कर्जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, जामखेडसाठी उजनी धरणातील अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून नागरिक, शेती आणि पशुधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
जामखेड येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेबाबत आढावा बैठक झाली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार सुनील कर्जतकर, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कर्जत आणि जामखेड तालुक्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. गावागावातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळामुळे नागरिकांचे स्थलांतर होऊ नये, यासाठी रोजगाराच्या कामांची संख्या वाढवून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पशुधनासाठी चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करून उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच न थांबता गावोगावी भेटी देऊन समस्या जाणून घ्याव्यात. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
कोणीही वंचित राहणार नाही : शिंदे
प्रा. राम शिंदे यांनी दुष्काळ निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. रोजगार आणि आजीविका हमी मिशनची कामे वाढविणे, जलजीवन मिशनमधील अपूर्ण योजना पूर्ण करणे तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी डीबीटीद्वारे मदत देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात येणार असून पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यावर भर
विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शासन संवेदनशीलपणे काम करीत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
बैठकीत कर्जत व जामखेड तालुक्यातील पाणीपुरवठा, चारा, रोजगार, वीजपुरवठा, अपूर्ण पाणीपुरवठा योजना आणि दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.