

राहुरी: मुळा पाणलोटातील पाऊस पाहता ऑगस्ट महिन्यात दरवाजे उघडले जाणार, अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने थांबा दिल्याने आवक मंदावली आहे. लाभक्षेत्रात तर अजुनही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे कालव्याच्या आवर्तनावरच शेतीपिकांना जीवदान मिळाल्याचे पहायला मिळाले. काल शुक्रवारी धरणसाठा 23 हजार 300 दलघफू (89.36 टक्के) इतका झाला आहे. धरणाकडे केवळ 2 हजार क्यूसेक प्रवाहाने नविन पाणी जमा होत आहे.
आषाढ सरींकडून अपेक्षा फोल ठरल्यानंतर श्रावण सरींकडून शेतकर्यांना मोठ्या अपेक्षा लागलेल्या होत्या. श्रावण प्रारंभी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने धरण लवकरच भरणार, अशी अपेक्षा मुळा लाभार्थ्यांना लागलेली होती. (Latest Ahilyanagar News)
सुरूवातीला श्रावण सरींचा जोरदार वर्षाव झाल्यानंतर धरणाकडे सुमारे 20 हजार क्यूसेक प्रवाहाने नविन पाण्याची आवक सुरू झाली होती. परंतु पावसाने थांबा घेतल्यानंतर आवकेत मोठी घट झाली. त्याचप्रमाणे लाभक्षेत्राही पावसाचा अपेक्षित वर्षाव झाला नाही. शेतकर्यांच्या खरीप पेरण्यांना पाऊस नसल्याने मुळा धरणाच्या आवर्तनाचा लाभ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दि. 12 जुलै रोजी उजवा व डाव्या कालव्यातून शेतकर्यांसाठी आवर्तन सोडण्यात आले होते.
दोन्ही कालव्यांतून अर्धा टीएमसी पाणी
उजवा कालवा 1100 क्यूसेक प्रवाहाने वाहतच आहे. उजव्यातून शेती सिंचनासाठी 1 हजार 368 दलघफू इतके पाणी खर्च झाले. तर डावा कालवा 150 क्यूसेकने वाहत असून त्यासाठी 219 दलघफू पाणी खर्च झाले आहे. खरीप आवर्तनाचा प्रारंभ झाला असून 31 जुलै पासून करण्यात आला आहे. 9 जुलै रोजी धरणाचे दरवाजे उघड जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडण्यात आले होते.
शेतकर्यांच्या खरीपावर संकटाचे ढग
जायकवाडीच्या दिशेने मुळातून 981 दलघफू पाणी वाहिले आहे. एकीकडे धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असल्याचे समाधान असताना दुसरीकडे मात्र पावसाने घेतलेला थांबा पाहता शेतकर्यांच्या माथ्यावर चिंतेचे ढग दाटलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुरी परिसरात ऊन-आभाळाचा खेळ सुरू आहे. तुरळक प्रमाणात रिमझिम सरी वगळता अपेक्षित पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकर्यांच्या खरीप पीकांवर संकट दाटले आहे.
22,833 दलघफू समांतर साठा ठेवणार
शासकीय जलाशय परिचलन सूची अनुसार धरणाचा साठा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट काळात 22 हजार 833 दलघफू इतका समांतर राखण्याचे निर्देश आहे. त्यापेक्षा अधिक पाणी साठा धरणात जमा आहे. परंतु पावसाने उघडिप घेतल्याने मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील व शाखाभियंता राजेंद्र पारखे यांनी दरवाज्यातून पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे समजले आहे. 1250 क्यूसेक प्रवाहाने दोन्ही कालवे वाहत आहे. त्यामुळे धरण पाणी साठा वाढत नसल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मागिल 5 वर्षातील आजच्या तारखेचा पाणी साठा
सन 2020- 11 हजार 674 दलघफू
सन 2021- 15 हजार 672 दलघफू
सन 2022- 19 हजार 720 दलघफू
सन 2023- 17 हजार 520 दलघफू
सन 2024-16 हजार 820 दलघफू
सन 2025- 23 हजार 300 दलघफू