

शिर्डी: महसूल हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित विभाग आहे. महसुली अधिकारी - कर्मचार्यांनी अधिक संवेदनशीलतेने काम करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह - 2025’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महसूल मंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली होती. त्याअंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात आले.
खंडकर्यांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागले. शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गायरान जमिनींचा वापर घरकुलांसाठी करण्यात आला. तसेच भोगवटा 2 मधील नोंदी भोगवटा 1 मध्ये करण्यात आल्या. महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या.
माजी मंत्री म्हस्के पाटील म्हणाले, खंडकर्यांचे अनेक प्रश्न महसूल विभागाच्या माध्यमातून सुटले असून योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे यावेळी भाषण झाले. प्रारंभी उत्कृष्ट अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी महसूल सप्ताहात राबविण्यात येणार्या महसूल सप्ताहातील उपक्रमांची व नागरिकांना पुरविण्यात आलेल्या महसूल सेवांच्या फलनिष्पत्तीची माहिती दिली.