

Talathi arrested for Bribe
पाथर्डी तालुका: पन्नास हजारांची लाज घेताना तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. एक ते सात ऑगस्ट दरम्यान राज्यभरात महसूल सप्ताह सुरू असताना, तालुक्यातील पारेवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाच्या बांधकामाला वाळू व मुरूम नेत असताना कारवाई टाळण्यासाठी आडगावचे तलाठी सतीश रखमाजी धरम व नायब तहसीलदार सानप यांनी यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर पन्नास रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. (Latest Ahilyanagar News)
याबाबतच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 2025 रोजी सापळा लावला. त्या वेळी तलाठी धरम आणि खासगी व्यक्ती अक्षय सुभाष घोरपडे (रा. शिंगवे केशव) यांना रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले.
मिरी गावातील वीरभद्र मंदिर परिसरात लाचेची रक्कम तलाठी धरम यांनी स्वतः स्वीकारून ती खाजगी व्यक्ती अक्षय घोरपडे याच्याकडे दिली होती. सतीश रखमाजी धरम (वय 40, अतिरिक्त चार्ज तिसगाव, रा. मिरी, ता. पाथर्डी) व अक्षय सुभाष घोरपडे (वय 27, रा. शिंगवे केशव, ता. पाथर्डी) यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला.
राज्य शासनाच्या महसूल सप्ताहा दरम्यान, महसूल विभागातीलच तलाठ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघड होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. शासनाच्या भ्रष्टाचारविरोधी धोरणावर असा प्रकार धक्का देणारा ठरत आहे.