

राहुरी: राज्यातील महत्त्वाचा, वादग्रस्त ठरलेला नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग राहुरीकरांसाठी अक्षरशः अभिशाप ठरत आहे. या रस्त्याची साडेसाती कधी संपणार, असा सवाल नागरिक करत असतानाच रस्त्याच्या कामाचा खोळंबा, ठेकेदाराची बेफिकीर, जागोजागी केलेली खोदकाम मोहीम आणि यामुळे संपूर्ण रस्ताच अपघातप्रवणक्षेत्र बनला आहे.
वाहतूकही दररोज ठप्प होते. गुरुवार आणि शुक्रवारी तर राहुरी शहराचा श्वासच अडकला. त्यातच एका मोठ्या खड्ड्यामध्ये पिकअप उलटून दोन प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात एकेरी वाहतूक सुरू असताना दोन्ही बाजूंचा रस्ता खोदण्यात आला. एकीकडे रस्ता संपूर्णपणे बंद आणि दुसरीकडे उखडलेले डांबर आणि खड्ड्यांनी भरलेला अरुंद मार्ग. परिणामी छोटे मोठे अपघात सुरूच आहेत. गुरुवारी सायंकाळी सिमेंट स्टेशनजवळील खड्ड्यात आदळून जनावरांचे खाद्य घेऊन जाणारा एक पीक अप पलटी झाले. चाक फुटून वाहन रस्त्याकडेला उलटले आणि दोघे जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात हलवले.
दरम्यान आठवडे बाजाराचा दिवस आणि नगर-मनमाड रस्त्यावरील मंद गतीचे काम, यामुळे राहुरी शहरात गुरुवारी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली. मिनिटाच्या अंतराचा प्रवास तासाभराचा झाल्याने चालक त्रस्त झाले. अंतर्गत रस्त्यांवर मार्ग बदलल्याने शहरातील वाहतूकही कोलमडली. शुक्रवारीही तोच गोंधळ कायम राहिला.
वाहतूक नियम मोडणाऱ्या चार बस गाड्यांवर कारवाई
अखेर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संपूर्ण पोलिस पथक रस्त्यावर आणत कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालक वाकड्या तिकड्या पद्धतीने वाहने चालवत वाहतुकीस अडथळा निर्माण करताना आढळले. विशेष म्हणजे राज्य परिवहन विभागाच्या बस गाड्याही कोंडीस कारणीभूत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ चार बस गाड्यांवर कारवाई केली. इतर अठ्ठावीस वाहनांवरही दंड आकारण्यात आला. एकूण बत्तीस वाहनांकडून बावीस हजार रुपये दंड वसूल झाला.