राहुरी: राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासाचा वेग वाढविण्यासाठी राहुरी नगरपरिषदेमार्फत विविध विकास योजनांना चालना देण्यात येत असून कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मंजूर झालेल्या कामांमधून शहराचा विकासाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असल्याची माहिती नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे आणि गटनेते हर्ष तनपुरे यांनी दिली.
राहुरी नगरपरिषदेत विकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शहराच्या प्रगतीला नवी गती मिळाली आहे. राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच माजी नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा परिणाम म्हणून नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सुमारे 2 कोटी 50 लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था होणार गतीमान
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राजश्री हॉटेलमागील सरोदे वस्ती ते काळे आखाडा रस्त्यापर्यंत डांबरीकरण, राहुरी कॉलेज मागील रस्ता ते दिनकर पवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, केशर मंगल कार्यालय कॉर्नर ते धावडे प्लॉट ओपन स्पेसपर्यंत रस्त्याचे काम, प्रकाश अरगडे घर ते शिंदे सर घर तसेच अनिल कोळसे घराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, नगरपरिषद हद्दीतील नावघाट परिसराची सुधारणा तसेच खंडोबा मळा येथील रस्त्याचे डांबरीकरण अशा अनेक कामांचा समावेश आहे.
दलितेत्तर वस्तीपर्यंत विकासगंगा
शहरातील उपेक्षित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. येवले आखाडा येथील अमरधाम ते सुधाकर मुरली जाधव वस्तीपर्यंत रस्ता खडीकरण, मुलनमाथा येथील अंगणवाडीला कंपाउंड वॉल, डौले वस्ती ते काळे आखाडा पुलापर्यंत रस्ता खडीकरण, कानिफनाथ चौक ते क्रांती चौक रस्ता खडीकरण, तांदुळवाडी येथील नुतन मराठी शाळेत शौचालय बांधकाम व इतर विकासकामे, पुरुषोत्तम नगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, येवले आखाडा येथील अमरधाम ते रवि येवले वस्तीपर्यंत काँक्रीट रस्ता तसेच तनपुरे खळवाडी येथील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण अशा विविध कामांचा यात समावेश आहे.
शहरात 155 घरकुलांना मंजूरी
दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेतून राहुरी नगरपरिषद हद्दीतील 78 आणि 77 अशी एकूण 155 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. नगराध्यक्ष व गटनेते यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. सध्या ही योजना सुरू असून पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शहराला आधुनिक व सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपुरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई तसेच सर्व नगरसेवकांनी स्पष्ट केले.
एक कोटींचा सोलर पॉवर प्रकल्प उभारणार
मुळा धरण पाण्याच्या टाकी परिसरात वीज बचतीसाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा सोलर पॉवर प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नगरपरिषदेच्या वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. पर्यावरणपूरक ऊर्जा वापराच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.