

Rahuri election candidates Tanpure vs Kardile
राहुरी: राहुरी नगरपरिषदेवर अनेक वर्षांपासून तनपुरे गटाची सत्ता दिसली. विरोधात विखे असो किंवा कर्डिले गट, राहुरीकरांनी प्रत्येकवेळी तनपुरेंवरच विश्वास दाखवला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत हक्काची व्होट बँक असलेल्या नगरपरिषद हद्दीतूनच तनपुरेंना दगा फटका झाला.
आता नगरपरिषद निवडणुकीत हाच पॅटर्न राहिला तर संधी आहे हे ओळखून कर्डिले, विखे गट हे पूर्णताकदीने उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र, विरोधकांकडे सध्यातरी शहरात ‘आश्वासक’ चेहरा नसल्याने तनपुरेंना नगरपरिषद निवडणूक ही कमबॅकची संधी समजली जात आहे. (Latest Ahilyanagar News)
राहुरी नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहिर करण्यात आली. राहुरी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेच्या पराभवानंतरही संपर्क कमी होऊ दिलेला नाही. याउलट आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यापेक्षा युवानेते अक्षय कर्डिले यांनी राहुरीत बैठका वाढवल्या आहेत. याशिवाय डॉ. सुजय विखे पाटील यांचा गटही अॅक्टीव्ह मोडवर दिसत आहे.
शहरात 12 प्रभागातून दोन नगरसेवक तर जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष असे एकूण 25 जणांची निवड पालिका हद्दीतील मतदार करणार आहेत. जारी केलेल्या प्रभागरचनेवर हरकत असल्यास 31 ऑगस्ट पर्यंत हरकत नोंदविण्याची आवाहन करण्यात आले आहे. सन 2011 च्या जनगणनेच्या आधारावर पालिका प्रशासनाची प्रभाग निश्चिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जाहिर केला.
जाहिर केलेल्या व्याप्ती व नकाशामध्ये शहरामध्ये एकूण 12 प्रभाग करण्यात आले. तर प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक अशी रचना मांडत जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगितले. मुख्याधिकारी वैभव लोंढे, कार्यालयिन अधिक्षक विकास घटकांबळे यांच्या मार्गदर्शनात पालिका प्रशासनाच्या वतीने प्रभाग रचना व नकाशा जाहिर करण्यात आला असून त्यावर हरकती मागविण्यासाठी 21 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. हरकत नोंदविण्यासाठी राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.
यापूर्वी राहुरी नगरपरिषदेमध्ये 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून दिले जात होते. नविन प्रभागरचनेनुसार 12 प्रभाग निश्चिती होऊन त्यामधून 24 नगरसेवक निवडून दिले जाणार असल्याने इच्छुकांच्या मनात उकळी फुटली आहे. लोकसंख्येच्या आधारे प्रभाग निश्चिती झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येवर आधारित नगरसेवक संख्या वाढणार असल्याचे दिसून आले आहे.
असे असतील प्रभाग
प्रभाग क्र. 1 हा येवले आखाडा (लोकसंख्या 3532), प्रभाग क्र.2 मुलनमाथा (लोकसंख्या 3177), प्रभाग क्र. 3 मेहेत्रे मळा, धाडगे इस्टेट (लोकसंख्या 2953) प्रभाग क्र.4 बुसासिंदबाबा दर्गा (लोकसंख्या 3189) प्रभाग क्र.5 श्री संत सावता महाराज (लोकसंख्या 3479) प्रभाग क्र.6 शुक्लेश्वर मंदिर (लोकसंख्या 3074) प्रभाग क्र.7 (लोकसंख्या 3468) प्रभाग क्र.8 बिरोबा नगर (लोकसंख्या 2916) प्रभाग क्र.9जोगेश्वरी आखाडा (लोकसंख्या 3347) प्रभाग क्र. 10 श्रीकृष्ण मंदिर (लोकसंख्या 3162) प्रभाग क्र.11 कषी उत्पन्न बाजार समिती व केशर मंगल कार्यालय (लोकसंख्या 3031) प्रभाग क्र. 12 राजवाडा/बालाजी मंदिर (लोकसंख्या 3485) अशा पद्धतीने प्रभाग रचना व लोकसंख्येवर आधारित करण्यात आली आहे.
राहुरीच्या सारीपाटावर पुन्हा तोच खेळ?
राहुरी नगरपरिषदेवर पूर्वीपासूनच तनपुरे गटाची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यानुसार माजी खा. प्रसाद तनपुरे, डॉ. उषाताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजप व मित्रपक्षांकडून राहुरी नगरपरिषद हद्दीत अनेक वर्षांपासून व्यूवहरचना आखली जात आहे.
मागिल निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात शहरवासियांनी तनपुरे गटाला एकहाती सत्ता दिली होती. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काँगे्रसकडून राज्यात विरोधी पक्षनेते पदावर असताना भाजपचे आ.शिवाजीराव कर्डिले यांनी एकत्र येत तनपुरे गटाविरोधात निवडणूक लढवली होती. राहुरी नगरपरिषदेच्या सत्तेबाबत सद्यस्थितीला भाजपकडून पुन्हा विखे व कर्डिले यांच्या नेतृत्वामध्ये शहरात कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. तर शहरात मोठे प्रस्थ असलेले तनपुरे यांना आपले वर्चस्व राखण्यासाठी पालिका निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.