

Ahilyanagar Heavy Rain Update today
नगर: भारतीय हवामान खात्याने 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यात विजांंच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
भिमा नदी (दौंड पूल)3 हजार 44 क्युसेक, सीना नदी (सीना धरण) 269 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्यास भिमा, प्रवरा, गोदावरी, घोड, सीना तसेच मुळा धरणातून होणार्या विसर्गामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू शकते. मुळा नदीपात्रातील कोतूळ येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Ahilyanagar Latest News)
मेघगर्जना, विजा किंवा वादळी वार्याच्या वेळी झाडाखाली किंवा त्याजवळ थांबू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, टॉवर, विद्युत खांब, धातूची कुंपणे, लटकणार्या केबल्स यांपासून दूर राहावे, मोकळ्या जागी असल्यास गुडघ्यावर बसून डोके व कान झाकावे, शेतीमाल व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य नियोजन करावे तसेच
आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या पोलिस ठाणे किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी नागरिकांना केले आहे.
गेल्या 24 तासांत 8.3 मि.मी. पाऊस
नगर शहर आणि परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 8.3 मिलिमीटर पाऊस झाला. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक 22.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीरामपूर तालुक्यात 18.5 तर कोपरगाव तालुक्यात 15.7, राहाता तालुक्यात 13.2 मिलिमीटर पाअस झाला आहे. जिल्ह्यात आजमितीस सरासरी 261 मिलिमीटर अपेक्षित असताना 207.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत 20.6 टक्के पावसाची तूट आहे.