

संगमनेर: गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नगरपालिका व पोलिस प्रशासनाकडून कसलीच उपाय योजना करण्यात आली नाही. शहरातील खड्डे बुजविण्यात आले नाही. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अद्याप शांतता कमिटीची बैठकच न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहून उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन शांतता कमिटीची बैठक आयोजित करत असते. (Latest Ahilyanagar News)
या बैठकीत नगरपालिका, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजकीय नेते, सह इतर सर्वच बैठकीला उपस्थित असतात. या बैठकीत सर्व घटक आपले मत मांडून योगदान देत असतात.
मात्र गणेशोत्सव दि. 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप शांतता कमिटीची बैठकच बोलविण्यात आलेली नाही. यामुळे गणेश मंडळासह पदाधिकार्यांनी पोलिस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर गणेश मंडळांना परवानगीसह वीजपुरवठा आवश्यक आहे. शहरात गणेश मूर्तींची दुकाने थाटली असून गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. शहर व तालुक्यात सर्वच गणेश मंडळांनी राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनीही तयारी सुरू केली आहे.
हा उत्सव शांततेत तसेच सलोख्याने साजरा व्हावा यासाठी समाजातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शांतता कमिटीच्या बैठकीत सहभागी होत असतात. शहर पोलिस स्टेशनच्या वतीने ही शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात येते. यात पोलिस उपाधीक्षक, शहर पोलिस स्टेशन, तालुका, घारगाव, आश्वीसह सर्वच पोलिस स्टेशनचे अधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी जातीने हजर असतात.
यंदा मात्र गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना शतता कमिटीच्या बैठकीबाबत कसल्याच हालचाली होताना दिसत नाही. पोलिस प्रशासनासह सर्वच अधिकारी कामकाजाबाबत उदासीन झाले आहे.
याबाबत गणेश मंडळाचे जुने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासन गणेशोत्सवात सहकार्य करत नसल्याचे सांगितले आहे. शांतता कमिटीची बैठक कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शांतता कमिटी बैठकीचे नियोजन सुरू आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची वेळ व तारीख मिळताच ही बैठक बोलविण्यात येणार आहे. गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
- पो. नि. रवींद्र देशमुख, शहर पोलिस स्टेशन