

राहुरी : चार महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीची सुटका करीत राहुरी पोलिस प्रशासनाने आरोपीला अटक केली आहे. राहुरी पोलिस प्रशासनाने ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत आतापर्यंत एकूण 76 मुलींचा शोध घेत त्यांना पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. (Ahilyanagar Latest Update)
राहुरी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ऑपरेशन मुस्कानसाठी विशेष यंत्रणात तैनात करत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यासाठी यंत्रणा हाती घेतली आहे. त्यानुसार बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोधात असणार्या पथकाने चार महिन्यापूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन युवतीचा काल शोध घेतला. मुलीचा पत्ता मिळवण्यासाठी पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राजू जाधव, पोलिस हवालदार अशोक शिंदे, गणेश लिपणे, सचिन ताजणे, पोलिस महिला कर्मचारी शितल थोरात, मीना नाचन, पोलिस नाईक संतोष दरेकर यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला. आरोपीसह त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. प्रकरणातील आरोपी ऋषिकेश बाबूराव सुर्यवंशी (वय 20) रा. ब्राम्हणी ता. राहुरी यास अटक करण्यात आली.
दरम्यान, पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी अल्पवयीन मुलींचा शोध लावत 76 गुन्ह्यांची उक्कल केली आहे. यासह दुचाकी चोरट्यांसह शेतकर्यांना त्रास देत विद्यूत पंप व केबल चोरी करणार्या टोळीचाही पर्दाफाश केला आहे. बनावट नोटा तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तसेच राहुरी घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आणत परप्रांतीय तसेच जिल्ह्याबाहेरील सराईत टोळ्या राहुरी पोलिस प्रशासनाने पकडल्या आहेत. त्यामुळे राहुरी पोलिस प्रशासनाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त होत आहे.
पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले की, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस उपअधिक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलिस ठाण्यात ऑपरेशन मुस्कान यशस्वी ठरत आहे. राहुरी परिसरामध्ये अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकांनी दक्षता बाळगत मुला-मुलींच्या मोबाईलची तपासणी करावी. आई वडिलांनी दक्षता घेतल्यास अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे प्रकार कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
राहुरी पोलिस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलींना पळवून नेत असल्याचे अनेक गुन्हे दाखल होत आहेत. मोबाईलचा अतिरेक वापराने मुली पळवून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींसाठी 16 वं वरीस धोक्याचं ठरत असल्याने पालकांनी दक्षता बाळगणे महत्वाचे असल्याचे दिसून येत आहे.