

नेवासा : प्रवरासंगमजवळील जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर रविवारी (दि. 3) नदीच्या पाण्यात संतोष महाजन बहुरे (वय 27, रा. चांभरवाडी, ता. अंबड, जि. जालना) याने नदीच्या पाण्यात उडी घेतली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी (दि. 4) नदीपात्रात आढळला. संतोष हा नगर जिल्ह्यातील नेवासा येथे कृषी खात्यात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. (Ahilyanagar Latest News)
याबाबत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12च्या सुमारास संतोष याने दुचाकी (एमएच 21, सीई 7456) उभी करून गोदावरी नदीपात्रात जुन्या पुलावरून उडी मारताना मच्छिमारांनी त्याला पाहिले होते. पण वरच्या धरणातून येणार्या पाण्याची आवक आणि फुगवटा क्षेत्रातील वाढलेल्या पाणीपातळीमुळे स्थानिकांना त्याला वाचविता आले नाही.
कायगाव येथील जुन्या पुलाजवळ रविवारी दुपारी दुचाकी बेवारस उभी असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. सोमवारी सकाळी 11 वा. मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी ओळख पटवून नातेवाइकांना माहिती दिली.
चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या संतोषचा मृतदेह पाहून पत्नी प्रिया यांनी टाहो फोडला. ज्या मुलाला पोटाला चिमटा देऊन घडविले त्याचा अंत्यविधी करण्याची वेळ आल्याने महाजन बहुरे आणि कमलबाई बहुरे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा आक्रोश पाहून नातेवाईकांसह गावकरी हळहळले.