

कर्जत: राशीन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकात शनिवारी (दि. 2) रात्री 9 वा. दोन गटांमध्ये वाद झाला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आल्यानंतर दोन्ही गटांच्या मिळून 30 जणांवर कर्जत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Ahilyanagar Latest News)
याबाबत कुंडलिक सायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये शनिवारी (दि. 2) रात्री नऊ वाजता माळी व मराठा समाजाची शांतता समिती बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे राशीन येथील महात्मा फुले चौकात बसवण्यात आलेल्या भगव्या झेंड्याच्या चौथरा बांधून त्यावर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक नावाची पाटी बसवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पाटी बसवण्यात आली असताना रात्री नऊ वा. चौकामध्ये येऊन शिवीगाळ केली, तसेच चौथर्याच्या काँक्रीटला लावलेल्या लाकडी पाट्या तोडून फेकून दिल्या व काठ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक असे लिहिलेल्या फलकाचा अवमान केल्याप्रकरणी सतपाल काळे, दीपक काळे, रवी भवर, औदुंबर काळे, विशाल गव्हाणे, विजय अवताडे, समाधान भोंडवे, विश्वंभर भाकरे, सचिन बर्डे, मच्छिंद्र सपाटे, आनंद कदम, युवराज काळे, सुशील भवर व इतरांवर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल शेटे यांनी दिलेल्या दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे बेकायदेशीर मंडळी जमवून दोन्ही समाजाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उभ्या केलेल्या भगव्या झेंड्याच्या फाउंडेशनचे ग्रॅनाईट तोडून त्याच्या कडेने सिमेंट काँक्रीटचा चौथारा उभा करून त्यास महात्मा फुले चौक असे नावाच्या पाट्या लावल्या. वास्तविक असा कोणताही निर्णय बैठकीत झाला नसल्यामुळे तुम्ही असे बांधकाम करू नका, असे म्हटल्याने शिवीगाळ केली. विलास नामदेव राऊत यांनी गचांडी पकडून मारहाण केली व जातीयवाचक शब्द वापरून झेंड्याचा अवमान केल्याप्रकरणी डॉ. विलास राऊत, मोहन सायकर, राहुल राऊत, पुंडलिक सायकर, रावसाहेब सायकर, विजय राऊत, अतुल राऊत, संजय जाधव, श्रीकांत सायकर, राहुल अनारसे, राजेंद्र मेहर, सूरज सायकर, बंडू धोंडे, अमोल सायकर, मिलिंद राऊत, रोहन सायकर, रावसाहेब सायकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.