

राहुरी: तालुक्यातील टाकळीमिया परिसरात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या पथकाने एका शेतकऱ्याच्या फार्महाऊसवर छापा टाकून दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या २५ गोण्या जप्त केल्या असून, परिसरातील संकलन केंद्रातून दुधाचे नमुने तपासणीसाठी नेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
टाकळीमिया परिसरात सकाळी 7.30 वाजता हे संयुक्त पथक दाखल झाले. त्यांनी एका फार्महाऊसवर छापा टाकून, पावडर पकडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली होती. तसेच परिसरातील दूध संकलन केंद्रातील तसेच शेतकऱ्यांच्या दुधाचे नमुने घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अन्य एका अधिकाऱ्याने मात्र राहुरीत कारवाई झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
परंतु अधिकृत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच मिळेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, नेवासे तालु्क्यात आणि अहिल्यानगर शहरातही काही ठिकाणी असे छापे आणि तपासणी झाल्याचे समजते. मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वात कारवायांचा धडाका सुरू असताना, अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू केलेल्या कारवायांबाबत गोपनीयता बाळगण्याच्या सूचना मुंडे यांनीच दिल्या आहेत का आणि दिल्या असतील तर का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.