

राहुरी: राहुरी महसूल विभागाकडून वाळू तस्करांविरुद्ध कारवाई होत नाही. वाळू तस्करांना पुर्णतः मोकळीक मिळाल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे. परिणामी ग्रामस्थांनाच वाळू तस्करांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावे लागत असल्याचा अनोखा प्रकार देसवंडी गावामध्ये दिसला. अवैध वाळू वाहतूा करणारे दोन टेम्पो ग्रामस्थांनी पकडले. याबाबत देसवंडीचे सरपंच नितीन कल्हापुरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सरपंच कल्हापुरे यांच्या तक्रारीनुसार (दि. 24 जानेवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास ग्रामस्थ दादासाहेब रामनाथ कल्हापुरे, भारत अशोक शिरसाठ व विठ्ठल बाळासाहेब कल्हापुरे यांनी सरपंच कल्हापुरे झोपले होते. यावेळी त्यांना मोबाईल कॉल आला. गावात घरकूल बांधण्यासाठी वाळू मिळत नसताना, काहीजण वाहने भरून वाळू तस्करी करीत आहेत, असे सांगण्यात आले. सरपंच कल्हापुरे व ग्रामस्थांनी गावामध्ये पाहणी केली असता, गावात भाऊराव दादासाहेब तमनर यांच्या घराजवळ टेम्पोमध्ये वाळू भरताना दिसला.
टेम्पो अडवून, चालकाला नाव विचारले असता, त्याने काहीही न सांगता पळ काढला. ग्रामस्थांनी पकडलेला टेम्पो अविनाश भांबळ (पूर्ण नाव माहित नाही. रा. रेल्वे स्टेशन, गावठाण, ता. राहुरी) याच्या मालकीचा असल्याचे समजले. यानंतर बाबासाहेब कोकाटे व अरुण कोकाटे यांच्या घराजवळ दुसरा टेम्पो वाळू भरताना दिसला. ग्रामस्थांनी टेम्पोबाबत विचारणा केली असता, याही चालकाने टेम्पो जागेवर सोडून पळ काढला. टेम्पो विकी तारू (रा. राहुरी) याच्या मालकीचा असल्याचे ग्रामस्थांना समजले. दोन्ही टेम्पो घेऊन ग्रामस्थ थेट पोलिस ठाण्याकडे निघाले असता, विकी तारू टेम्पो ताब्यात घेऊन पसार झाला.
देसवंडीचे सरपंच कल्हापुरे व ग्रामस्थांनी, टाटा कंपनीचा (709 टेम्पो क्र. एमएच 04 एएल 9605) मध्ये दीड ब्रास वाळूसह पोलिस ठाण्यात जमा केला आहे. पोलिसांनी वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे करीत आहे.
महसूलशी ‘अर्थ’पूर्ण सलगी!
राहुरी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिनदिक्कत वाळू तस्करी सुरूच आहे. प्रशासनाशी ‘अर्थ’पूर्ण सलगी करुन, वाळू तस्कर नदी पात्राचे अक्षरशः लचके तोडत आहेत. याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या जातात, परंतू महसूल प्रशासनाच्या केवळ बघ्याच्या भूमिकेमुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.