

राहुरी: नवरात्रोत्सवातील उपवासासाठी भगर खाल्ल्याने राहुरी परिसरात सुमारे १५ जणांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. राहुरी शहर, येवले आखाडा, राहुरी स्टेशन आणि वाघाचा आखाडा परिसरातील सुमारे १० ते १५ जणांना हा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित रुग्णांवर राहुरी शहर आणि राहुरी फॅक्टरी परिसरातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असून, तिघांना अहिल्यानगर येथे हलविण्यात आल्याचे समजते.
नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात. या काळात भगर हा उपवासात खाल्ला जाणारा प्रमुख पदार्थ असतो. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत भगरीची मागणी वाढते. अशा परिस्थितीत भगर खाल्ल्यानंतर अनेकांना एकाच वेळी त्रास झाल्याचे वृत्त समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येवले आखाडा येथील प्रा. बाळासाहेब जगन्नाथ जाधव आणि त्यांच्या आई सुमनबाई यांच्यासह अनेक जण उपचार घेत आहेत.
वाघाचा आखाडा येथील सुरेश पटारे यांना अहिल्यानगर येथे हलविण्यात आल्याचे समजते. इतर बाधितांवरही विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. संबंधित भगरीचा पुरवठा कोठून झाला, तिची साठवणूक कशी करण्यात आली होती, विक्रीपूर्वी गुणवत्ता तपासणी झाली होती का आणि वापरलेल्या अन्नपदार्थात नेमकी कोणती त्रुटी होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे. भगरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जाणार का, संबंधित विक्रेत्यांकडील साठ्याची पाहणी होणार का आणि अन्न व औषध प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बुरशीच्या प्रादुर्भावामुळे विषबाधा शक्य
याबाबत इतर तज्ज्ञांकडून माहिती घेतली असता भगर आणि तत्सम भरडधान्यांची साठवणूक करताना दमट हवामान, आर्द्रता यामुळे भगरीवर प्रामुख्याने 'अस्परजिलस' (Aspergillus) प्रजातीच्या बुरशीचा प्रादुर्भाव लवकर होतो. या बुरशीमुळे भगरीमध्ये 'फ्युमिगाक्लेविन'सारखी विषारी द्रव्ये तयार होतात. अशी बुरशीयुक्त भगर खाल्ल्याने विषबाधा होते. तसेच अनेकदा दुकानातून मुदतबाह्य झालेली किंवा जास्त काळ साठवलेली भगर असेल, तर त्यातही बुरशी आणि जिवाणू तयार झालेले असतात. कोंदट किंवा दमट जागी साठवलेल्या भगरीला लगेच बुरशी लागते. ती खाल्ल्याने विषबाधेची शक्यता बळावते. खात्रीशीर दुकानातून पॅकबंद भगर खरेदी करण्याचा आणि पाकिटावरील उत्पादनाची तारीख व मुदतबाह्य होण्याची तारीख तपासण्याचा आणि घरातही भगर नेहमी कोरड्या आणि सुरक्षित डब्यात साठविण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
पौष्टिकतेने समृद्ध भरडधान्य
दरम्यान, भरडधान्य उत्पादन विषयातील तज्ज्ञ तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ.योगेश बन, प्रमुख, नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले आपल्या मानवी आहाराचा विचार केल्यास सर्वच भरडधान्यांमध्ये नाचणी, वरी, राळा, बर्टी, कोडो व प्रोसो मिलेट ही प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिज ( Ca, Fe, Mg, Zn), स्निग्ध पदार्थ यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असते. तसेच ही सर्व धान्य ग्लूटेन फ्री, हळुवार पचन होणारी आणि पौष्टिकतेने समृद्ध असल्याने उपवास काळात अन्न म्हणून सेवन केल्याने आपल्याला भूक लागत नाही आणि थकवा जाणवत नाही. त्यामुळे फक्त उपवास काळापुरता नाही तर नियमितपणे या धान्याचा आहारात वापर होणे गरजेचे आहे.