

नगर: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आपल्या देशाची, पंतप्रधानांची बदनामी केली. मात्र, आपला देश परदेशातून नाही, तर संसदेतून चालतो. त्यामुळे काँग्रेसला लोकशाहीच मान्य नसेल, तर भाजपचे कार्यकर्तेदेखील जशास तसे उत्तर देतील, असा इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दिला. केंद्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी बाहेरून प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपतर्फे काढण्यात आलेल्या ‘लोकशाही वाचवा-अराजकता हटवा,’ या पदयात्रेनंतर दिल्लीगेट येथे झालेल्या सभेत मंत्री विखे बोलत होते. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, सर्व आमदार मोनिका राजळे, सुनील कर्जतकर आणि अक्षय कर्डिले, तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, अनिल मोहिते, विनायक देशमुख, उपमहापौर धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेचा या सभेत निषेध नोंदवण्यात आला. विखे पाटील म्हणाले, राज्यात सर्वांत मोठी पदयात्रा नगरमधून निघाली. लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचे संरक्षण करण्याचा संकल्प करणारी ही पदयात्रा आहे. डॉ. आंबेडकरांनी पवित्र संविधान दिले. काँग्रेसने संविधान पायदळी तुडवले, तरी राहुल गांधी आज संविधानाची प्रत घेऊन दारोदार फिरत आहेत. मात्र जनता तुम्हाला कधीही थारा देणार नाही.
सरकार अस्थिर करण्यासाठी बाहेरून प्रयत्न!
आपल्या देशाची प्रगती जगाला पाहवत नाही. जगातील काही शक्ती विरोधी पक्षांना पैसे देतात. सीजेपी आंदोलनालाही बाहेरून मदत झाली, असा आरोप करतानाच देशातील सरकार अस्थिर करण्याचा बाहेरील देशांतून प्रयत्न होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.
‘मोदी कही नही जायेगा’
डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदींसाठी एक गाणे समर्पित केले. ‘मोदी कही नही जायेगा..’ या गाण्यावर त्यांनी कार्यकर्त्यांसह ठेका धरला. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनाही जोश आला. हे पाहताच पालकमंत्री विखे पाटील यांनी त्यांच्या हातात भाजपचा ध्वज दिला. मग शिंदे यांनीही ताल धरला...
पंतप्रधानांचा अपमान खपवून घेणार नाही
अतिशय त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये परावर्तित झाले आहे. निवडणुकांमध्ये पराभव होतो. लोकांना विचार पटत नाहीत, तेव्हा विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा भूमिका बजावता आली पाहिजे. दुर्दैवाने देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संविधानिक संस्थांची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. 70-80 वर्षांचे नेते असलेले विरोधक हे पंतप्रधानांविषयी खालच्या पातळीवर टीका करत असतील तर हे जनता खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिला. ते म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवली जात आहे. असे असताना विरोधकांना सभागृहात बोलता येत नाही. लोकशाही नीतीमूल्ये जोपासता येत नाहीत. विरोधकांकडे मुद्दे नाहीत, प्रश्न विचारता येत नाहीत, गोंधळही घालता येत नाही.