

नगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा रखडलेला प्रश्न तूर्त आता निकाली निघाला आहे. जनतेला अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या जागेमध्ये सुरू करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. आवश्यक कामे, पदनिर्मिती इत्यादीसाठी सुमारे 485 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयाचे नगरकरांमधून स्वागत केले जात आहे. (Ahilyanagar News Update)
राज्याच्या निमशहरी, ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील जनतेस आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. यास्तव राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणार्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात योग्य जागेअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती. अनेक दिवसांपासून जागेच्या प्रश्नावर प्रशासकीय व राजकीय काथ्याकूट सुरू होता. खा. नीलेश लंके यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सरकार अनुकूल होते. त्यानुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास दि. 6 मे 2025 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार, महाविद्यालयाचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे राहील. अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्थावर जंगम मालमत्ता व मनुष्यबळासह, तात्पुरत्या स्वरूपात किमान 7 वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास नि:शुल्क वापरण्यासाठी दिले जाणार आहे.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरिता आवश्यक व सुयोग्य जागेबाबत मुख्यमंत्री यांंच्या मान्यतेने गठित मंत्री समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. संबंधित जागा महसूल विभागाच्या सहमतीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास नि:शुल्क हस्तांतरीत करण्याचे आदेश आहेत. या जागेत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्यास मान्यता दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास, त्यावरील खर्चास आणि पदे भरण्यास मान्यता मिळाली आहे. यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथील करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात येत आहे.
अंदाजे 485.08 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रु. 361.75 कोटी व पहिल्या चार वर्षाकरिता आवती खर्च सुमारे रुपये 123.33 कोटी) इतका निधी उपलब्ध करून खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, चौथ्या वर्षाप्रमाणे आवश्यक आवती खर्चासाठी प्रति वर्षी सुमारे रूपये 43.61 कोटी इतका निधी उपलब्ध करून त्याप्रमाणे खर्चास मान्यता मिळाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरिता आवश्यक असणारी स्वच्छता, आहार, सुरक्षा, वस्त्र स्वच्छता ही सर्व कामे बाह्यस्त्रोताव्दारे करून घेण्याच्या सूचना आहेत.संबंधित कामे शासनाच्या पूर्व मान्यतेने जाहीर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून ठेकेदारांच्या नियुक्तीद्वारे करुन घेण्यात यावीत, असेही आदेशित करण्यात आले आहे.