

Pune Nagpur Vande Bharat
नगर: दौंड-मनमाड मार्गावर पहिल्यादांच नागपूर-पुणे वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस धावणार आहे. रविवार (दि.10) सुरू होणार्या या एक्सप्रेसला अहिल्यानगर रेल्वेस्थानकावर दोन मिनिटांचा अधिकृत थांबा देण्यात आला आहे.
या रेल्वे गाडीमुळे पुणे आणि नागपूरला जाणार्या जिल्ह्यातील प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने तिकिट बुकिंग करण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. (Latest Ahilyanagar News)
भारतीय रेल्वे मंत्रालयाने नागपूर- पुणे आणि पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 10 ऑगस्ट 2025 मुहूर्त निश्चित केला आहे. 10 ऑगस्ट रोजी अजनी (नागपूर) स्थानकातून ही एक्सप्रेस सुटेल.
सोमवार वगळता इतर सहाही दिवशी पुण्याकडे तर मंगळवार वगळता इतर सहाही दिवशी नागपूरकडे ही गाडी धावणार आहे. अजनी स्थानकातून ही गाडी सकाळी 9.50 वाजता पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. सायंकाळी 7.35 वाजता ती नगर स्थानकात येईल. येथून 7.37 मिनिटांनी ती पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. या वंदे भारतमुळे अहिल्यानगर जिल्हा पुणे व नागपूरशी थेट जोडला जाणार आहे.
नगरच्या प्रवाशांना अवघ्या दोन मिनिटांत गाडी पकडावी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. पुणे-नागपूर ही एक्सप्रेस गाडी पुण्याहून सकाळी 6.25 वाजता सुटणार असून, नगर स्थानकांवर सकाळी 8.33 वाजता पोहचणार आहे. नगर स्थानकावरील प्रवासी घेऊन अवघ्या दोन मिनिटांत ही गाडी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.
नाश्ता आणि जेवण सुविधा
इतर रेल्वे गाड्यापेक्षा तिकिटाचा दर जास्त असला तरी त्यात नाश्ता आणि जेवण प्रवाशांना रेल्वेकडून दिले जाणार आहे. वेटिंगचे कोणतेही तिकिट दिले जाणार नाही. कन्फर्म तिकिटच प्रवाशांना दिले जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अहिल्यानगरमधून दुसरी ‘वंदे भारत’
नगर जिल्ह्यातील नागपूर-पुणे ही दुसरी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. शिर्डी ते मुंबई ही पहिली ट्रेन धावत असून आता नागपूर-पुणे धावणार आहे. मात्र दौंड-मनमाड मार्गावरील ही पहिलीच वंदे भारत धावणार आहे.
एसी आणि लक्झुरिअस कोच
नागपूर-पुणे दरम्यान धावणार्या ‘वंदे भारत’ ट्रेनला आठ डब्बे (कोच) असणार आहे. यातील सात कोच हे एसी असून एक लक्झरिअस असणार आहे. आठ कोचमधून सुमारे 400 ते 500 प्रवासी प्रवास करू शकतील अशी माहिती अहिल्यानगर रेल्वेस्थानक प्रमुख महाजन यांनी दिली.