

Pratap Dhakane on the brink of BJP again
पाथर्डी तालुका: शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे हे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांनी गेल्या काही दिवसांत मुंबई आणि दिल्ली येथे काही गुप्त भेटी घेतल्या आहेत. अकरा वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकत ढाकणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
तेव्हापासून त्यांनी भाजपविरोधात दोन विधानसभा निवडणुका लढवल्या; पण त्यांना अपेक्षित राजकीय यश लाभले नाही. आता कार्यकर्त्यांचा वाढता दबाव, बदलती राजकीय समीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ढाकणे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे ढाकणे-राजळे हे पारंपरिक राजकीय विरोधक पुन्हा एकाच पक्षात एकत्र येणार का?
2014 मध्ये स्वर्गीय राजीव राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली, त्याचवेळी अॅड. ढाकणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत राजळे-ढाकणे एकत्र आले होते. आता जर अॅड. ढाकणे भाजपात आले, तर भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि अॅड. प्रताप ढाकणे पुन्हा एकाच पक्षात कार्यरत राहतील. ही स्थिती भाजपच्या अंतर्गत गट राजकारणाला एक नवा कलाटणी देऊ शकते. अॅड.प्रताप ढाकणे यांनी भाजपमध्ये यावे असे जोरदार प्रयत्न ढाकणे समर्थक तथा भाजपावर प्रेम करणार्या कार्यकर्त्यांचे सुरू आहेत. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघावर लोकनेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा विशेष प्रभाव असून, येथील राजकीय घडामोडींवर त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
ढाकणे यांच्या पुनर्प्रवेशाबाबत भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असली, तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. काहींनी त्यांना पक्षात घेण्यास संकोच व्यक्त केला असून, स्थानिक पातळीवर यामुळे असंतोषही उसळू शकतो, अशी चर्चा आहे. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहेत. ढाकणे यांचा भाजप प्रवेश झाला, तर तालुक्यातील अनेक वर्षांची राजकीय रेषा मिटून नवीन आघाड्यांचे चित्र उभे राहील. त्यामुळे अॅड. प्रताप ढाकणे यांचा भाजप प्रवेश केवळ एक ‘पक्षबदल’ न राहता, शेवगाव-पाथर्डीच्या आगामी राजकारणाला कलाटणी देणारा मोठा घटनाक्रम ठरू शकतो. अॅड. ढाकणे यांनी बराच काळ भाजपमध्ये पक्षाच्या मोठ्या पदावर काम केले असून त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपमधील अनेक जुन्या नेत्यांबरोबर आजही चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याचा फायदा ढाकणे यांना होणार का? हे पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.