

नगर : मध्यवर्ती शहरात पावसाळ्यात चितळे रस्ता येथील जिल्हा वाचनालयापासून ते अमरधाम, सीनानदीपर्यंत रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहते. सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे, रहिवाशांचे हाल होतात. आता या मार्गावर पावसाळी गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून 150 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून या कामाला निधी मिळाला आहे. गटारीचे काम सुरू असून यामुळे या भागात पाणी साचून निर्माण होणार्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरात सुरू असलेल्या रस्ते व इतर कामांची माहिती घेतली. प्रमुख रस्ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले. मध्य शहरात पावसाळ्यात जिल्हा वाचनालयापासून ते गांधी मैदान ते लक्ष्मी कारंजा ते आनंदी बाजार ते नालेगाव ते गाडगीळ पटांगण ते अमरधाम ते सीनानदीपर्यंत पावसाचे पाणी वाहते. सखल भागात गुडघाभर पाणी साचते. काही भागात नागरिकांच्या घरापर्यंत पाणी शिरते. या समस्येवर पावसाळी गटार व काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत आहे. या मार्गावरील जुनी पावसाळी गटार अनेक वर्षे जुनी आहे. ठिकठिकाणी ती खचली आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचणी येत होत्या.
आता शासनाकडून मिळालेल्या निधीतून या ठिकाणी पावसाळी गटार व रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले असून गटारीचे काम सुरू आहे. 1200 एमएम व्यासाची गटार लाईन होत आहे. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहण्याचा प्रश्न सुटणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होऊन रस्त्याचे काम सुरू होणार आहे. काँक्रिटीकरणामुळे रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्नही मार्गी लागेल व नगरकारांची या त्रासापासून सुटका होईल, असा विश्वास मनपा अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.