

नव्या प्रभाग रचनेत मोडतोडीनंतर जन्माला आलेल्या प्रभाग 3 या वार्डात महायुती सोबतच महाविकास आघाडीकडेही इच्छुकांची कमी नाही. मात्र गत लोकसभा आणि विधानसभेला घेतलेल्या भूमिकेमुळे विखे-जगताप मैत्रीपर्वातून ‘करेक्ट कार्यक्रम’ होण्याच्या चिंतेने इच्छुकांची झोपमोड झाली आहे.
सावेडीतील एकवीरा चौकापासून सुरू झालेला हा वार्ड थेट मुकुंदनगरच्या वेशीपर्यंत म्हणजेच पावन गणपती मंदिरापर्यंत पसरला आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या मतदारांपर्यंत पोहचताना भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, शिवसेना (उबाठा)चे निष्ठावंत योगीराज गाडे, आ. जगताप यांचे निष्ठावंत अजिंक्य बोरकर या इच्छुकांची कसोटी लागणार आहे. विखे-जगताप यांच्या मैत्रीपर्वातूनच या भागाचे भावी नगरसेवक निश्चित होतील, असे आजचे चित्र आहे.
शिवसेनेचे (उबाठा) नेते जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे चिरंजीव योगीराज यांचा हा वार्ड. मात्र या वार्डाची नव्या रचनेत मोठी तोडफोड झाल्याचे दिसून येते. भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस निखील वारे यांच्याही वार्डाची तोडफोड होऊन या वार्डाची निर्मिती झाली आहे.
पूर्वी गुलमोहर रस्त्यापर्यंतच सीमा असलेेला हा वार्ड आता त्यापलीकडील शीलाविहारपर्यंत जाऊन पोेहचला आहे. सहकारनगर, मॉडेल कॉलनी, अभियंता कॉलनी, पारिजात चौक, नवलेनगर, महापालिका कार्यालय हा भाग नव्याने जोडलेल्या वार्डातून तारकपूर वगळण्यात आले आहे. सिव्हील हडकोचे दोन भाग होऊन एक भाग या वार्डात आला. गंधे यांचे निवास असलेला भाग याच वार्डात.
राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांच्या विरोधात वंदना कुसळकर (भाजप), कमल दरेकर (शिवसेना) आणि राष्ट्रवादीच्या शोभा बोरकर यांच्या विरोधात संगीता खरमाळे (भाजप), संगीता केरूळकर (शिवसेना) अशी लढत झाली होती.
ही लढत पाहता राष्ट्रवादी विरोधात भाजप अशीच झाली, मात्र यंदाच्या निवडणुकीत विखे-जगताप यांची मैत्री पाहता राष्ट्रवादी विरोधात भाजप लढतीची शक्यता धूसर वाटते. अर्थात अजून महायुतीचा निर्णय होणे बाकी आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. भाजपकडून माजी नगरसेविका उषाताई नलावडे, संगीता खरमाळे यांच्यासह महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, नितीन शेलार इच्छुकांच्या यादीत आहेत. राष्ट्रवादीकडून अजिंक्य बोरकर किंवा शोभा बोरकर, ज्योती अमोल गाडे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत.
महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक योगीराज गाडे पुन्हा याच वार्डातून लढणार असून त्यांचे सहकारी मात्र अजून ठरायचे आहेत. महाविकास आघाडीकडून लढण्यास अनेक इच्छुक या वार्डात आहेत, मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी देताना ‘जिंकण्याचा’ निकष लावला जाईल, तर उलटपक्षी महायुतीची उमेदवारी मिळविताना ‘करेक्ट कार्यक्रमाचा’ विचार केला होण्याची शक्यता अधिक.
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी कोणी विखेविरोधी भूमिका घेतली त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कसा होणार? याची उत्सुकता असली तरी त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मात्र महापालिका निवडणुकीत या वार्डातून एक-दोघांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार ही कळ्या दगडावरची रेघ मानली जाते. संगीता खरमाळे या भाजपच्या एकनिष्ठ असल्या तरी गत सलग दोन निवडणुकांत त्यांचा पराभव झाला आहे.
आताही त्यांना पुन्हा आशा लागून आहे. प्रिया जानवे या भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष आहेत. गतवेळी त्या भाजपकडून इच्छुक होत्या, पण त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. आता त्या उमेदवारीच्या दावेदार मानल्या जातात. भाजपकडून गतवेळी विजयी झालेले स्वप्नील शिंदे हे खून प्रकरणात अडकल्याने तेथे भाजपला उमेदवारी बदलावी लागणार आहे. माजी नगरसेविका उषाताई नलावडे उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
पराभवाच्या पाच वर्षांतही त्या भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्या, ही त्यांची जमेची बाजू म्हणता येईल. संपत नलावडे यांचा वार्डातील संपर्क आणि मागील टर्मच्या परिसराचा समावेश पाहता नलावडे यांनी जोमात तयारी सुरू केल्याचे दिसते. योगीराज गाडे यांच्यासोबतच स्वपक्षातीलच काहींची लोकसभा निवडणुकीवेळची भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांच्या डोक्यात पक्की बसलेली आहे.
टप्प्यात येताच ते ‘करेक्ट कार्यक्रम’ करतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आ. संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादीकडे ज्योती गाडे, अजिंक्य बोरकर या विद्यमानांसह अनेक नवखे इच्छुक आहेत. आ. जगताप मात्र ‘इलेक्टिव्ह मेरिट’ वापरूनच उमेदवारी देतील, असे चित्र आहे. तूर्तास ‘मैत्रीपर्वाने’ कोणालाच ग्रीन सिग्नल दिला नसला तरी तो गृहीत धरून इच्छुक प्रभागात दिसू लागले आहेत.
गाडे नावाभोवतीच फिरणार इलेक्शन!
गत निवडणुकीत दोन गाडेंमध्येच काँटे की टक्कर पाहावयास मिळाली होती. योगीराज शशिकांत गाडे विरोधात जितेंद्र सूर्यकांत गाडे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. ज्योती गाडे राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या, पण त्या महिला राखीव जागेवर. गाडे घराण्यातील तिघे निवडणुकीच्या मैदानात होते. आताही गाडे नावाभोवतीच ही निवडणूक फिरण्याची चिन्हे आहेत. फक्त कोण कोणत्या पक्षाकडून हे मात्र अजून निश्चित नाही. ज्योती गाडे या आ. शिवाजी कर्डिले यांच्या कन्या, तर आ. संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत. त्यामुळे या वार्डात ‘सोधा’चे राजकारण पाहावयास मिळण्याचीच शक्यता अधिक!