Ahilyanagar Ganesh Visarjan: नगरकरांचा गणरायाला भक्तिभावाने निरोप; बारा तास विसर्जन मिरवणूक

ढोल-ताशा, डीजेच्या दणदणाटात तरुणाई बेधुंद
Ahilyanagar Ganesh Visarjan
नगरकरांचा गणरायाला भक्तिभावाने निरोप; बारा तास विसर्जन मिरवणूकPudhari
Published on
Updated on

नगर: अहिल्यानगरकरांनी अकराव्या दिवशी शनिवारी गणपती बाप्पाला भक्तिभावाने उत्साहात निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या गगनभेदी घोषणांनी अवघे शहर दुमदुमले होते.

ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून रात्री नऊ वाजेच्या आसपास गणेशमूर्तीचे विसर्जन केले. उर्वरित सोळा मानाच्या मंडळांची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरूच होती. (Latest Ahilyanagar News)

Ahilyanagar Ganesh Visarjan
Shingnapur Temple: शिंगणापूर देवस्थानकडून पुजारी मानधनावर! आजपासून अंमलबजावणी

ढोल-ताशा आणि डीजेच्या दणदणाटात तरुणाई बेधुंद झाली होती. आबालवृध्दांच्या गर्दीने मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे मिरवणूक संथगतीने पुढे पुढे जात होती. दरम्यान, मिरवणुकीतील जवळपास सर्वच गणेश मंडळांनी डीजे लावले होते.

अहिल्यानगरीतील नागरिकांत शनिवारी सकाळपासूनच उत्साहात बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू होती. घराघरांतील गणेशमूर्तीच्या पूजा आणि आरतीस प्रारंभ झाला. मोठमोठ्या गणेश मंडळांची मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी धावपळ सुरु होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते सकाळी दहा वाजताच शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणेश या मानाच्या गणपतीची उत्थापन पूजा करुन आरती केली. आरती आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी ढोल वादन करुन पारंपारिक पद्धतीने मिरवणुकीचा शुभारंभ केला.

ढोल- ताशा, लेझीम आदींचा गजर आणि फुलांची आणि गुलालाची उधळण करीत मिरवणूक हळूहळू पुढे सरकत होती. या मानाच्या गणपतीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत होते. दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान, या मिरवणुकीत इतर मानांचे गणपती सहभागी होत गेले. या मिरवणुकीत मानाचे बारा आणि इतर पाच अशी सतरा मंडळांचे गणपती मिरवणुकीत सहभागी झाले होते.

ढोल- ताशा आणि डिजेच्या तालावर शहरातील तरुण- तरुणींनी ठेका धरीत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा गगनभेदी जयघोष करीत अख्खे शहर दणाणून सोडले होते. अनेक मंडळांचे ढोल -ताशा लक्ष वेधून घेत होते. काही ठिकाणी महिला व तरूणींनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरीत मिरवणुकीचा उत्साह वाढविला होता. मिरवणूक बघण्यासाठी ठिकठिकाणी आबालवध्दांची गर्दी ओसंडून वाहत होती.

Ahilyanagar Ganesh Visarjan
Ahilyanagar Politics: आजोबांना विचारा, पापाचे वाटेकरी कोण; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

रात्री पावणेनऊ नऊ वाजेच्या सुमारास श्री विशाल गणपती मंदिरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. इतर सोळा मानाच्या गणेश मंडळांची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. मंडळांतील तरुणांनी आणि मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या तरुणांनी विविध चालींवर ठेका धरला होता. या उत्साहात आणि जयघोषांत ही मिरवणूक कोठीची तालीम, बंगाल चौकी, धरती चौक, आडते बाजार चौक, तेलीखूंट, कापडबाजार, चितळे रोडमार्गे दिल्लीगेटच्या बाहेर मध्यरात्री पडली.

सावेडी, केडगाव व इतर उपनगरांत देखील गणेश विसर्जनाची मिरवणूक जोरात सुरू होती. डीजे आणि ढोल ताशांचा गजरात या उपनगरातील मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन केले. शहरातील मिरवणुकीतील गर्दी बघून अनेकांनी उपनगरातील मिरवणुकीत सहभागी होत लाडक्या गणरायाला निरोप दिला.

तगडा पोलिस बंदोबस्त

अहिल्यानगर शहरातील विसर्जन मिरवणूक बारा तास सुरु होती. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

या मिरवणुकीवर ते जातीने लक्ष ठेवून होते. पोलिस प्रशासनाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकीवर वॉच ठेवला होता. पोलिसांनी होमगार्डची मदत घेऊन मिरवणूक शांततेत कशी पार पडेल याचे नियोजन केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता अहिल्यानगर शहरातील गणेश विसर्जन आणि मिरवणूक शांततेत पार पडली.

महापालिकाकडून सुविधा

घरगुती गणेश मूर्ती आणि सहा फूट उंचीपर्यतच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने प्रभागनिहाय कृत्रिम कुंड तयार केले होते. निर्माल्यासाठी कुंडाजवळच खास ट्रॅक्टरची सुविधा देखील उपलब्ध केली होती. कल्याण रोडवरील बाळाजीबुवा विहीर, पाईपलाईन रोडवर यशोदानगर विहीर आणि भोसले आखाडा येथील साईनगरातील विहिरीत मोठ्या मूर्तीचे विर्जन करण्यात आले. इतर पंधरा ठिकाणी घरगुती मूर्तीचे विसर्जन झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news