

पारनेर: शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी (दि. 23) सकाळी 10च्या सुमारास आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले. समस्त पारनेरकरांतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील हिंद चौक ते क्रीडा संकुल आणि गणपती फाटा या प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? अशी विचारणा करत वाहनधारक आणि पादचाऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, आज शेकडो नागरिक मारुती मंदिर परिसरात एकवटले आणि रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनाची तीव्रता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुबोध वसईकर व राजपथ इन्फ्रा कंपनीचे अधिकारी चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांनी यावेळी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. अखेर प्रशासनाने आंदोलकांना लेखी पत्र दिले.
त्या मध्ये नमूद करण्यात आले आहे की, शहरातील खड्डे डांबराचा वापर करून तातडीने बुजवण्यात येतील. रस्त्याच्या नवीन कामासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण दि. 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येईल. हे सर्वेक्षण पुढील 15 दिवसांत पूर्ण करून कामाला गती दिली जाईल. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी हा लढा संपलेला नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
जर दि. 1पासून प्रत्यक्ष कामाला किंवा सर्वेक्षणाला सुरुवात झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे नागरिकांनी स्पष्ट केले. आंदोलनामुळे शहराची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ व पंढरकर यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाहतूक सुरळीत केली.
या वेळी सखाराम औटी, विजय औटी, राजू औटी, रा. या. औटी, विजय डोळ, पाणीपुरवठा सभापती योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, भाजपचे तालुका सरचिटणीस कल्याण थोरात, नगरसेवक अशोक चेडे, बाजार समिती संचालक चंदन भळगट, नितीन आडसूळ, अर्जुन भालेकर, शंकर नगरे, नगरसेवक भूषण शेलार, वकील गणेश कावरे, भगवान गायकवाड, दत्ता अंबुले, ॲड. मंगेश औटी, आनंदा औटी आदींसह नागरीक उपस्थित होते.
आंदोलकांकडून अधिकारी धारेवर!
पारनेर शहरातील रस्त्यांचा आंदोलनाचा मुद्दा असताना राजपथ कंपनीचे अधिकारी मात्र अस्तगाव, हंगा याबाबतच प्रश्न उपस्थित करत असल्याने आंदोलकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आंदोलन शहर रस्त्यांसाठी आहे या विषयावर बोला असे आंदोलकांनी खडसावून सांगितले. पारनेरकरांतर्फे बऱ्याच वर्षातून सर्व पक्षांनी एकवटून आंदोलन केले.