

पाथर्डी: पाथर्डी तालुक्याला जीवनदायी ठरणारा घाटशीळ पारगाव मध्यम प्रकल्प अखेर चार वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. शनिवारी (दि. 13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या तलावाच्या भिंतीवरील सांडव्यातून पाणी ओसंडून बाहेर पडू लागले. परिसरात आनंदाचे आणि दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
घाटशीळ पारगाव (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथे या प्रकल्पाची भिंत आणि काही भाग असली तरी तलावातील साठवण क्षमता आणि लाभ नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला मिळतो.या तलावाची सांडव्याची उंची 5.50 मीटर असून, यावरून पाणी भरून वाहणात आहे. या पाण्याचा लाभ घाटशीळ पारगाव, चुंभळी, टाकळी, ढाकणवाडी, मानूर, गाडेवाडी, टेंभुर्णी, जवळवाडी, श्रीपातवाडी अशा परिसरातील गावांना मिळणार आहे. सुमारे दीड हजार एकर शेती या प्रकल्पामुळे ओलिताखाली येते. (Latest Ahilyanagar News)
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. यापूर्वी झालेल्या पावसाने तलाव 80 टक्क्यांहून अधिक भरला होता. मात्र, नव्या पावसामुळे तलाव तुडुंब भरून अखेर ओव्हर फ्लो झाला आहे. सांडव्यातून खळखळ आवाजात वाहणारे पाणी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी वाढत असून, परिसर पर्यटन स्थळाचे स्वरूप धारण करत आहे.
या प्रकल्पामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा मोठा आधार मिळतो. शेतीसाठी पाणी मिळणे, ओलिताखाली येणाऱ्या पिकांचे संरक्षण करणे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करणे, यासाठी घाटशीळ पारगाव तलाव जीवनरेषा मानला जातो. तालुक्यातील बहुतांश मोठे तलाव, नाले आणि बंधारे भरल्यानंतर उर्वरित पाणी या तलावात जाऊन मिळते.
त्यामुळे शेतीबरोबरच गावांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होते.सन 1972 च्या भीषण दुष्काळानंतर या प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आली होती. साधारण 1976-77 च्या दरम्यान तलावाची निर्मिती पूर्ण झाली. अशी माहिती येथील शेतकरी बबन त्र्यंबक नेरकर यांनी दिली.त्यानंतर अनेक दशके हा प्रकल्प शिरूर कासार व पाथर्डी तालुक्याच्या पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाचा आधार ठरत आहे.
चार वर्षांनंतर तलाव तुडुंब भरल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धो-धो वाहणारे पाणी, खळखळ आवाज, सांडव्यातून पडणारे लाटांसारखे पाणी पाहण्यासाठी लोकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील हा निसर्गसौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी हळूहळू पर्यटकांचीही गर्दी वाढू लागली आहे.
पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी, शिरसाटवाडी, मोहरी, पटेलवाडी, घाटशिरस यांसह अनेक तलावही भरले आहेत. सध्या संपूर्ण परिसरातील नाले, बंधारे तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.