

संगमनेरः संगमनेर तालुका बाजार समितीने नेहमी शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा पुरविल्या आहेत. वडगाव पान, साकुर, आंबी दुमाला, निमोण येथे उपबाजार सुरू केल्या. अत्याधुनिक सुविधा येथे पुरविल्या आहेत, असे सांगत, केंद्र शासनाने केलेले काळे कायदे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने रद्द झाले अन्यथा, बाजार समिती रद्द झाल्या असत्या.
शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनापुढे केंद्राला अखेर झुकावे लागले, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.थोरात कारखाना कार्यस्थळी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. (Latest Ahilyanagar News)
अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव खेमनर होते. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, पांडुरंग घुले, लक्ष्मण कुटे, सुधाकर जोशी,संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, सुनील कडलग, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कानोरे, सतीश खताळ, दीपाली वर्पे, अनिल घुगे, सखाराम शरमाळे, निलेश कडलग, मनसुख भंडारी, निसार शेख, सचिन करपे, सचिव सतीश गुंजाळ आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, शेत मालाला चांगला भाव मिळावा, व्यापाऱ्यांना चांगली सुविधा मिळावी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा, या उद्देशातून, मध्यस्थीची भूमिका असणारी बाजार समिती स्व. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केली. ही कल्पना पुढे देशभर राबविण्यात आली.
शेतमाल बाजार समितीत विकावा, असे आवाहन करीत, केंद्र सरकारने मागील वर्षी तीन काळे कायदे केले. या कायद्यांविरोधात उत्तर भारतात मोठे आंदोलन झाले म्हणून, कायदे रद्द केले. अन्यथा, बाजार समित्या रद्द झाल्या असत्या, असे सांगत ते म्हणाले की, बाजार समिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सभापती शंकर खेमनर म्हणाले की, वडगाव पान येथील 16 एकर जागा बाजार समितीने विकत घेतली आहे. तेथे विकास कामे सुरू आहेत. एक हजार टन साठवणक क्षमतेचे गोडाऊन बांधले जात आहे. शेतमालास तारण कर्ज देण्याची व्यवस्था केली आहे.
आंबी खालसा येथे 15 एकर जागा शेतमाल खरेदी विकत घेतली आहे. निमोण येथेही 2 एकर जागा कांदा मार्केटसाठी घेतली आहे. लूज कांदा खरेदी वडगाव पान येथे सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमीत- कमी 200 रुपये फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीमध्ये उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार सरकारने करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सभा नोटीसचे वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले. अनिल घुगे यांनी आभार मानले.यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व आडतदार उपस्थित होते.
‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समिती संकल्पना संपूर्ण देशात राबविण्यात आली. संगमनेर बाजार समितीने शेतकरी व व्यापारी या सर्वांना चांगल्या सुविधा देवून, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
- माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर.