

नगर: जिल्ह्यात शनिवारी (दि. 13) रात्रीपासून रविवारी (दि. 14) पहाटेपर्यंत झालेल्या सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. शेवगाव, पाथर्डी व कर्जत या तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. या तिन्ही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. नेवासा, जामखेड, श्रीरामपूर, नगर व राहुरी या तालुक्यांत देखील जोरदार पाऊस झाला.
राशीन महसूल मंडलात सर्वाधिक 142 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्हाभरात सरासरी 34.9 मिलिमीटर नोंद झाली. या दमदार पावसाने दिलासा मिळाला असला तरी ठिकाणी खरीप पिके पाण्याखाली गेली. या पावसाचा फटका काढणीला आलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांना बसला आहे. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महिना दीड महिन्यानंतर शनिवारी (दि. 13) सायंकाळी अहिल्यानगरसह जिल्हाभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. नगर शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसाने शहरभरात पाणीच पाणी केले. रात्री उशिरापर्यंत संततधार सुरूच होती. शेवगाव, पाथर्डी व कर्जत या तालुक्यांना पावसाने झोडपत सर्वत्र पाणीच पाणी केले.
पंधरा दिवसांपूर्वीच शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती. पाथर्डी तालुक्यातील 220 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. शेतकरी या नुकसानीतून सावरत नाही तोच शनिवारी पुन्हा पाथर्डी, शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. शेवगाव तालुक्यात सरासरी 81.4, पाथर्डी तालुक्यात 72.4 तर कर्जत तालुक्यात 68.8 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने या तालुक्यांतील छोटे मोठे तलाव भरून पाणी शेतात शिरले. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी सायंकाळी सुरू असलेला पाऊस काही तालुक्यात पहाटेपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरूच होता. गेल्या साडेतीन महिन्यांत पहिल्यांदाच जिल्हाभरात सरासरी 35 मिलिमीटर पाऊस झाल्याचा अंदाज आहे. 19 महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. काही मंडलांत 50 तर काही मंडलात 40 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात सर्वांत कमी सरासरी 6.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मंडलनिहाय पाऊस
राशीन : 142, माही : 68.3, कर्जत : 79.3, वालवड : 79.3, कोरेगाव : 79.3, अरणगाव : 68.3, शेवगाव : 73.5, बोधेगाव : 102, चापडगाव : 102, ढोरजळगाव : 67.3, एरंडगाव : 80.3, मुंगी : 88.3, पाथर्डी : 67, माणिकचौंडी : 67, टाकळी : 87.5, कोरडगाव : 86.8, मिरी : 66.8, खरवंडी : 87.5, अकोला : 86.8. (मिलिमीटर)
तालुकानिहाय पाऊस
नगर : 30.1, पारनेर : 18.1, श्रीगोंदा : 21.1, कर्जत : 68.6, जामखेड : 37.7, शेवगाव : 81.4, पाथर्डी : 72.4, नेवासा : 42.7, राहुरी : 25.4, संगमनेर : 15.4, अकोले 10.5, कोपरगाव : 6.5, श्रीरामपूर : 36.9, राहाता : 17.4. (मिलिमीटर)